मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'थेट अतिरेक्यांच्या अंगावरच गाडी घातली' मारुती फड यांनी सांगितला 26/11 चा थरारक अनुभव,video

'थेट अतिरेक्यांच्या अंगावरच गाडी घातली' मारुती फड यांनी सांगितला 26/11 चा थरारक अनुभव,video

X
26/11

26/11 दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांच्या अंगावर सरकारी कर्मचारी मारुती फड यांनी गाडी घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता.

26/11 दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांच्या अंगावर सरकारी कर्मचारी मारुती फड यांनी गाडी घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता.

 • Local18
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 26 नोव्हेंबर : 26/11  दहशतवादी हल्ल्याला आज 14 वर्ष पूर्ण झाले आहेत. 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण मुंबई हादरून गेली होती. या दहशतवादी हल्ल्यात मुंबईकरांनी खूप काही गमावलं. कुणाचं छत्र हरपलं तर कोणी घरातला कर्तापुरूष गमावला. या हल्ल्यात मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. त्यापैकीच 26/11 दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न करणारे सरकारी कर्मचारी मारुती फड हे देखील शूरवीरांपैकी एक आहेत. केवळ देव बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले. मारुती हे मंत्रालयातील वैद्यकीय शिक्षण सचिव भूषण गगराणी यांच्या गाडीवर चालक म्हणून कार्यरत होते.

  मारुती फड सांगतात की, मी त्या वेळी वैद्यकीय शिक्षण सचिव भूषण गगराणी यांच्या गाडीवर चालक म्हणून होतो. दिवसभराच कामकाज संपवून घरी आलो होतो. तितक्यात सीएसटी परिसरात गोळीबार झाल्याची बातमी कळाली. टीव्ही लावला वृत्तवाहिन्यांवर मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्याच्या बातम्या सुरू होत्या. काही वेळात आमच्या वरिष्ठ सचिवांचा फोन आला, 'मारुती आपल्याला मंत्रालयात तातडीने जायचं तर गाडी घेऊन या' असा निरोप मिळाला.

  ...आणि अंगावर गाडी घातली

  मी कोणताही विचार न करता गाडी घेऊन मी घरातून निघालो. त्याच दरम्यान कसाब आणि त्याचा सहकारी सीएसटीमध्ये गोळीबार करून कामा हॉस्पिटल समोरील भिंतीवर उड्या टाकून सेंट झेवियर्स कॉलेजच्या समोरील रस्त्यावर आले होते. त्याचवेळी मी समोरुन गाडी घेऊन आलो होतो. मी त्यांना पाहिलं पण ते एका अंगाने उभे असल्यामुळे त्यांच्याकडील शस्त्र मला काही दिसले नाही. मला वाटलं ते कॉलजेची पोरं आहेत. तेवढ्यात तिथून दोन पोलीस जात होते. त्यांच्यावर त्यांनी गोळीबार केला. मला कळून चुकलं हेच अतिरेकी  आहेत. मी त्यांच्या अंगावर गाडी घातली. ते दोघेही फुटपाथच्या पलीकडे पडले. त्यांच्या हातातील गन खाली पडली. फुटपाथवर उंचवटा असल्यामुळे माझी गाडी काही पुढे सरकेना. तितक्यात त्यांनी बंदूक उचलली आणि माझ्यावर गोळी झाडली.

  Mumbai 26/11: कसाब माझ्यासमोरून गेला...'त्या' रात्रीचा सर्वात भीतीदायक अनुभव, Video

  मी सीटचे बटन दाबून मागे झोपलो. तेवढ्यात एक गोळी माझ्या डोक्याच्या बाजूने सीटमध्ये घुसली. मी अगदी काही इंचाने वाचलो नाहीतर ती गोळी माझ्या डोक्यात घुसली असती. पण स्टे़अरिंग पकडलेली होती त्यात एक गोळी माझ्या हाताला लागली आणि हाताचे मधले बोट तुटून पडले. आता दोघेही माझ्यावर गोळीबार करत होते. मी त्याच अवस्थेत गाडी रिव्हरर्स मागे घेतली. गाडीच्या डाव्या दरवाज्यातून एक गोळी घुसून माझ्या कंबरेत घुसली.

  त्यानंतर त्यांनी गाडीचे डावे टायर फोडले. गाडी जागेवरच थांबली होती. म्हटलं उतरून पळावं पण ते शक्य नव्हते. तेवढ्यात त्यांनी एक ग्रेनेड गाडीवर फेकले. सुदैवाने ते गाडीच्या खालून जात पुढे जाऊन फुटले. मी पुन्हा थोडक्यात वाचलो. पण अचानक ते दोघे गाडीकडे चालत येत होते. मी म्हटल आता मेलो. तेवढ्यात काय सुचलं ते देवास ठाऊक, तुटलेल्या बोटातून प्रचंड रक्त निघत होतं. मी डोक्यावर रक्त ओतून घेतलं आणि मरण्याचं सोंग केलं. ते दोघेही गाडी जवळ आले त्यांनी गाडीचा दरवाजा उघडून पाहिला. त्यांना खात्री झाली की मी मेलो. त्यानंतर ते तिथून पुढे निघून गेले, असं मारुती फड सांगतात.

  Video : 26/11 च्या रात्री काय घडलं? हल्ल्यात जखमी झालेल्या पत्रकारानं सांगितला थरार

  मारुती फड यांच्या हाताला कंबरेला गोळी लागली. काही दिवसांनी ते यातून बरे झाले. पण तांत्रिक काम करण्यात अडचणी येऊ लागल्यात. विशेष केस म्हणून त्यांची बदली मंत्रालयात करण्यात आली. 14 वर्षांनंतर सगळं काही सुरळीत जरी झालं असलं तरी तो दिवस आठवला तर अंगावर काटा येतो. माझ्या हाताचे बोट मला रोज त्या दिवसाची आठवण करून देते. ती रात्र आणि तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही, असं मारुती फड सांगतात.

  First published:

  Tags: 26/11 mumbai attack, Local18, Mumbai