मुंबई, 19 ऑगस्ट : आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. कारशेडमधून प्रवास करण्यावरून वाद झाला. हा वाद तापला त्यामुळे पोलीस आणि प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली. संतापलेल्या प्रवाशांनी ट्रेन रोखली. कारशेडमधून प्रवास करू न देण्यावरून हा वाद झाला. त्यातून पोलीस आणि प्रवासी आमनेसामने आले. यावेळी प्रवाशांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यामुळे प्रवाशांनी आणखी संताप व्यक्त केला आहे. नवीन ट्रॅक होऊनही मेल चालवल्यामुळे ट्रेनमध्ये प्रवास करायला मिळत नसल्यामुळे जीव धोक्यात टाकून कराशेड लोकलमधून प्रवास करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी लोकांनी आंदोलन केलं.
कारशेड लोकलकडे होम प्लॅटफॉर्म बांधण्याबाबत सरकार कोणतीही ठोस पावलं उचलत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर लोकल वाढवण्याऐवजी लांब पल्ल्याच्या गाड्या चालवण्यासाठी ट्रॅक बांधण्यात येत असल्याने नागरिकांचा संताप झाला. याआधी देखील इथे नागरिकांनी आंदोलनं केली होती. मात्र प्रत्येकवेळी आश्वासनंच पदरात पडली. त्यामुळे अखेर नागरिकांनी लोकल अडवून या गोष्टीचा निषेध केला आहे. यावर आता सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे.