मुंबई, 22 ऑगस्ट : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांच्या अपघाती निधनावर आज पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली. यावेळी भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे एक्स्प्रेस वेवर मेटेंच्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात झाल्याची माहिती दिली. तसंच, मेटेंच्या चालकाबद्दलही संशय व्यक्त केला आहे. माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूबाबत लक्षवेधी उपस्थित केली. या लक्षवेधीमध्ये विनायक मेटे यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाही. वेळेवर रुग्णवाहिका येत नाही, असा आक्षेप घेण्यात आला. याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर खुलासा केला आहे. ‘मुंबई पुणे एक्स्प्रेसवर भल्या पहाटे मेटे हे मुंबईकडे येत होते. त्यावेळी एक्स्प्रेसवर एक मोठा ट्रॉलर हा शेवटच्या लेनमध्ये चालला होता, जो मधल्या लेनमध्ये चालला होता. त्यामुळे मेटे यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी जागा मिळत नव्हती. त्यामुळे काही काळ मेटेंच्या चालकाने प्रयत्न केला. पण, जागा कमी असल्यामुळे त्यांना ओव्हरटेक करता आले नाही. त्यानंतर पुढे जाऊन ट्रॉलर तिसऱ्या लेनमध्ये गेला आणि तिसऱ्या लेनमध्येही ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला तिथेही समोर एक गाडी होती. तिथे जागा कमी होती, पण तिथूनही ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि ते अतिशय चुकीचे जजमेंट होते. त्यामुळे गाडी ट्रॉलरला धडकली. कारच्या ज्या बाजूने अंगरक्षक आणि विनायक मेटे बसले होते, त्याबाजून कार धडकली ’ अशी माहिती फडणवीस यांनी दिली. ‘डॉक्टरांकडून माहिती घेतली तेव्हा त्यांनी असं सांगितलं, विनायक मेटे यांचा जागेवरच मृत्यू झाला असावा. पण, याबद्दल अहवाल आल्यावर योग्यपणे सांगता येईल. पण गंभीर परिस्थिती अशी आहे की, अपघात झाल्यानंतर मेटेंच्या चालकाने 112 नंबरवर फोन केला होता. तो नवी मुंबईकडे वळवण्यात आला. माहिती मिळताच लगेच नवी मुंबई पोलीस निघाले. तो सारखा टनेलच्या पलीकडे असल्याचं सांगत होता. पण, पोलीस जेव्हा सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांना कुणीच दिसले नाही. पुढे आणखी एक दीड किलोमीटर पोलीस गेले, तिथेही त्यांना कुणी आढळलं नाही. त्यामुळे मेटेंच्या चालकाने फोन खरा केला की खोटा केला, असा प्रश्ननिर्माण झाला होता. तेवढ्यात पोलिसांनी पुन्हा त्याला फोन केला, तेव्हा तो रायगड पोलिसांच्या हद्दीत अपघाताचे ठिकाण होते. तोपर्यंत आरबीआयची गाडी तिथे 7 मिनिटांमध्ये पोहोचली होती. मेटेंना रुग्णालयात घेऊन गेले, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. आता मेटेंचा मृत्यू जागेवर झाला की वाटेत नेत असताना झाला, याची चौकशीअंती समोर येईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. तसंच, आम्ही विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू संदर्भात प्रकरण सीआडी कडे वर्ग केले आहे. सीआयडीने या प्रकरणाचा सखोल अभ्यास करावा. यामध्ये काही घातपात आहे का याबाबींचा देखील तपास करण्यात यावा, असे निर्देशही फडणवीसांनी दिले. ‘मेटे यांच्या निधनानंतर आपण रात्रीचा प्रवास टाळला पाहिजे. मी सभागृहात सांगतो की हा प्रवास टाळला पाहिजे. मी ही रात्री प्रवास करतो त्यामुळे आपण सर्वांनी रात्रीचा प्रवास टाळला पाहिजे कारण अपघात होण्याची शक्यता असते. विनायक मेटे यांच्या पत्नी म्हणाल्या की, मी त्यांना रात्री प्रवास करु नका असं सांगितलं होतं मात्र त्यांनी ऐकलं नाही, त्यामुळे रात्रीचा प्रवास टाळावा, अशी विनंतीही फडणवीसांनी सर्व आमदारांना केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.