नवी दिल्ली, 25 मार्च : प्लास्टिकच्या वापराचे काही फायदे असले तरी अनेक तोटेदेखील आहे. प्लास्टिकमुळे निसर्गाची हानी होते. याच कारणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गप्रेमी प्लास्टिकच्या वापरावर बंदी (Plastic Ban) घालण्याची अशी मागणी करत आहेत. विविध सामाजिक संघटना, जागरूक नागरिक अशा अनेकांकडून प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. एकीकडे प्लास्टिकवर बंदीची मागणी होत असताना दुसरीकडे प्लास्टिकचा वापर काही कमी होण्याचं लक्षण दिसत नाही. आता प्लास्टिकचा मानवी शरीरावरदेखील विपरीत परिणाम होत असल्याचं आढळून आलं आहे. डच संशोधकांनी केलेल्या नव्या संशोधनातून मानवी रक्तातही मायक्रोप्लास्टिक (Microplastic In Human Blood) असल्याचं आढळून आलं आहे. हे पहिल्यांदाच घडलं असून, ही धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं जात आहे. डच संशोधकांनी केलेल्या नव्या संशोधनात 22 निरोगी व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 17 जणांच्या रक्तात मायक्रोप्लास्टिक आढळून आलं आहे. हे तुकडे शरीराच्या आत जातात आणि अवयवांमध्ये चिकटतात आणि त्यांना ब्लॉक करतात. हे संशोधन नेदरलँडमध्ये करण्यात आलं. संशोधनात सहभागी असलेल्या सर्व 22 व्यक्ती पूर्णपणे निरोगी होत्या आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता; मात्र संशोधनाअंतर्गत केलेल्या चाचणीच्या नमुन्यात प्लास्टिकचे कण आढळल्याने संशोधकांना आश्चर्याचा धक्का बसला. हे ही वाचा- पचनसंस्था चांगली त्याचं आरोग्यही चांगलं; म्हणून आहारात या 5 गोष्टी असाव्यात यापूर्वी केलेल्या एका संशोधनात संशोधकांना मायक्रोप्लास्टिकचे कण मानवी मेंदू आणि पोटात, तसंच अगदी न जन्मलेल्या बाळांच्या नाळेलाही चिकटलेले असल्याचं आढळलं होतं. त्यातले काही शौचावाटे बाहेर पडले; मात्र रक्तात मायक्रोप्लास्टिकचे कण सापडण्याची ही पहिलीच घटना आहे. नेदरलँड्समधल्या व्रिज युनिव्हर्सिटी अॅमस्टरडॅमचे प्रोफेसर डिक वाथक यांनी ‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, की हे खूपच धक्कादायक आहे. प्रदूषण इतकं वाढलं आहे, की आता ही घाण श्वासासोबतच मानवी शरीरातही जात आहे. प्लास्टिकचे कण शरीरात कसे प्रवेश करू शकतात असा विचार तुमच्या मनात आला असेल तर हे लक्षात घ्या की मायक्रोप्लास्टिक (Microplastic) हे प्लास्टिकचे खूप लहान कण असतात. ते धुळीच्या कणांप्रमाणे शरीरात जातात आणि त्यानंतर शरीराचे अवयव ब्लॉक होऊ लागतात. संशोधकांनी केलेल्या या अभ्यासादरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. या अभ्यासानुसार एक माणूस दररोज सुमारे सात हजार मायक्रोप्लास्टिक कण शरीरात घेतो. या संशोधनात आठ वर्षांच्या मुलीच्याही रक्ताची तपासणी करण्यात आली. या मुलीच्या रक्तातदेखील मायक्रोप्लास्टिकचे अनेक कण आढळून आले. संशोधकांनी यामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की ही मुलगी ज्या पलंगावर झोपायची आणि ज्या खेळण्यांसोबत खेळायची ते सर्व सिंथेटिक मटेरियलचं (Synthetic Material) बनलेलं होतं. त्यामुळे तिच्या शरीरात हे तुकडे मोठ्या प्रमाणात आढळून आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.