मुंबई, 23 ऑक्टोबर : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबर महापालिकेच्या निवडणुकांची चाहूल लागल्याने राज्यातील राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. सध्या ठाकरे गटाची मुंबई महापालिकेवर सत्ता असल्याने ठाकरे गटाला रोखण्यासाठी शिंदे गट आणि भाजपने कंबर कसली आहे.
ठाकरे गटाच्या विरोधकांना एकत्र करण्याचे काम भाजप आणि शिंदे गटाकडून सुरू आहे. यामध्ये राज ठाकरे यांच्याशी वाढलेली जवळीकता आणि त्यांच्यातील युतीची चर्चा यावरून मनसे, भाजप आणि शिंदे गट एकत्र येण्याची शक्यता आहे. यावर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी सूचक वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
हे ही वाचा : काल अमित शहांना शुभेच्छा, आज उद्धव ठाकरेंसोबत नार्वेकर असणार दौऱ्यावर, नाराजीची चर्चा गेली वाहून!
राज ठाकरेंचा आदेश जो असेल तो मान्य
मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील म्हणाले की, काही गोष्टी या राजकारण सोडून बघितलं पाहिजे, सरकार जर आमच्या मागण्याचा सकारात्माक विचार करणार असेल तर जवळ येण्यास काहीच हरकत नाही. पूर्वीच्या सरकारमध्ये आमच्या मागण्याचा सकारात्मक विचार झालाच नाही. उलट त्या कशा पूर्ण होणार नाहीत याकडे लक्ष देण्यात आले असे आमदार पाटील म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मागण्याचा सकारात्मक विचार होत असल्याने आमची जवळीक वाढली आहे. मात्र या भेटीगाठीचा कोणीही असा अर्थ काढू नये. कारण माननीय राजसाहेबांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं की आम्ही स्वबळावर लढणार आहोत. परंतु अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर युती करायलाही काही हरकत नाही.
हे ही वाचा : ‘शिंदे गटातील 22 आमदार नाराज, भाजपात विलीन होणार’, शिवसेनेचा मोठा गौप्यस्फोट
कारण सध्या ज्या युत्या, आघाड्या होतात त्यामध्ये कोणाकडेच काही बोलायला राहिलं नाही. मग आम्ही आमचा पक्ष वाढवायचा नाही का? राजसाहेबांचे आदेश आले तर आम्ही त्याला तयार असू, आणि इतरांची पण काही हरकत नसावी, असे राजू पाटील म्हणाले.