मुंबई, 20 ऑगस्ट : भाजपने आशिष शेलार (Ashish Shelar) यांना मुंबईचं अध्यक्ष (BJP Mumbai President) केल्यानंतर त्यांनी थेट शिवसेनेला अंगावर घ्यायचं ठरवल्याचं दिसत आहे. काल शुक्रवारी भाजपने थेट आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत दहीहंडीवेळी शक्तीप्रदर्शन केलं. आशिष शेलार यांनी त्याआधी ट्विटरवरून शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्याला प्रत्त्युत्तर देण्याआधीच पुन्हा एकदा आशिष शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातून थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. काय म्हणाले आशिष शेलार? हिंदुत्वाचा ज्वलंत विचार जगणाऱ्या वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न त्यांच्या मा. सुपुत्रांना पुर्ण करण्यास नाही जमले. म्हणून त्यांना वंदनीय मानणाऱ्यांनी ते पुर्ण करु नये का? ते इतरांनी पुर्ण केले म्हणून त्यांच्या मुलांनी एवढे चिडावे का? आपल्या वडिलांच्या विचारांनी झपाटून समाजातील लोक, आयुष्य खर्च करुन आपल्या वडिलांचे स्वप्न पुर्ण करतात. याचा, त्यांच्या सुपुत्रांना आनंदच व्हायला हवा ना? असा थेट सवाल करत शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. पुढे ते म्हणाले, की पेला अर्धा भरला आहे, असेही म्हणता येते पेला अर्धा रिकामा असेही म्हणता येते. फक्त भरला आहे, म्हणायला मोठे मन लागते. उरला प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पर्व संपत आले म्हणून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव भाजप वापरते असे जे मा. सुपुत्रांना वाटतेय. हे म्हणजे अती झाले आणि हसू आले. पण काय करणार? आपण घरात बंद खोलीत बसून राहिलो की, बाहेरचे विशाल जग संपल्यासारखे वाटायला लागतेच, असा टोलाही शेलार यांनी लगावला आहे.
हिंदुत्वाचा ज्वलंत विचार जगणाऱ्या वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न त्यांच्या मा. सुपुत्रांना पुर्ण करण्यास नाही जमले... म्हणून त्यांना वंदनीय मानणाऱ्यांनी ते पुर्ण करु नये का?
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 20, 2022
ते इतरांनी पुर्ण केले म्हणून त्यांच्या मुलांनी एवढे चिडावे का?
1/3
याआधी आदित्य ठाकरेंना लक्ष्य आशिष शेलार यांनी त्याआधी ट्विटरवरून शिवसेनेवर निशाणा साधला होता. भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड.. आमचा गड म्हणून मिरवायचे… आता बघा कसे सगळे गडगडायला लागलेय, भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत. लवकरच, मुंबईकरच वरळीतून कोसळणाऱ्या थरांचा थरार निवडणूकीत “करुन दाखवतील” आमचं ठरलंय!! असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं होतं.
भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड.. आमचा गड म्हणून मिरवायचे...
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 18, 2022
आता बघा कसे सगळे गडगडायला लागलेय
भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत...
लवकरच..
मुंबईकरच वरळीतून कोसळणाऱ्या थरांचा थरार निवडणूकीत "करुन दाखवतील"
आमचं ठरलंय!!
2/2
एकीकडे भाजपने आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या जांभोरी मैदानात दहीहंडीचं आयोजन केलं होतं, तर दुसरीकडे शिवसेनेनं शिवसेना भवनसमोर निष्ठेच्या दहीहंडीचं आयोजन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गड असलेल्या ठाण्यातही शिंदे आणि शिवसेना यांच्यात दहीहंडीवरून सामना पाहायला मिळाला. एकनाथ शिंदेंच्या दहीहंडीशिवाय राजन विचारे यांच्या दहीहंडीनेही अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.