मुंबई, 13 सप्टेंबर : 100 कोटी वसूली प्रकरणात अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील तपास अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. तपास अधिकारी तहसीन सुलतान यांची करण्यात बदली करण्यात आली आहे. ईडीच्या वतीनं मुंबई सत्र न्यायालयात ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख्य यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांचा न्यायालयातील मुक्काम वाढला आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. तपास अधिकाऱ्यांची बदली गेल्या काही महिन्यांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीच्या आरोपासाठी तपास सुरू आहे. अद्यापतरी या प्रकरणात विशेष कोणतीही माहिती समोर आली नाही. याचदरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तपास अधिकारी तहसीन सुलतान यांची करण्यात आली असून राजीव कुमार नवे तपास अधिकारी आहे, अशी माहिती ईडीच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयात देण्यात आली. शिवसेना नेते अनिल परब यांच्या ईडी प्रकरणातही सुलतान यांनी चौकशी केली होती. दरम्यान, हे रुटीन ट्रान्सफर असल्याची माहिती ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. वाचा - आदित्य ठाकरे-जयंतरावांची टीका, फडणवीस रशियाला, अजित पवार एकनाथ शिंदेच्या भेटीला अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ 100 कोटी वसुली प्रकरणात अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा न्यायालयातील मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आता त्यांना 27 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडी विशेष कोर्टात आज अनिल देशमुख, संजीव पलांडे यांना हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी न्यायालयाने हा निर्णय दिला. ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मागील वर्षी 2 नोव्हेंबर रोजी देशमुख यांना अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. महिन्याला 100 कोटी वसूल केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी मुंबईतील मोठमोठे डान्सबार आणि रेस्टॉरंट मालकांकडून दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूल केले, असा धक्कादायक आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. त्यांनी याबाबतचं पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालकांना पाठवलं होतं. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. संबंधित प्रकरणामुळे विरोधकांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे देशमुखांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.