मुंबई 12 ऑक्टोबर : अंधेरी पूर्व मतदारसंघातील एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. ही निवडणूक 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जात आहे. मात्र, ऋतुजा लटके यांनी एक महिन्यापूर्वी दिलेला राजीनाम्याचा अर्ज अजूनही BMC प्रशासनानं स्वीकारला नाही. यामुळे उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर आता अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. अनिल परब याबद्दल बोलताना म्हणाले, की ऋतुजा परब यांनी एक महिन्यापूर्वी राजीनामा दिला होता. मात्र, 3 ऑक्टोबरला 1 महिन्याने राजीनामा चुकीचा असल्याची माहिती बीएमसीने दिली. या प्रकरणात राजीनामा मंजूर न झाल्यास कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आज दुपारी कोर्टात सुनावणी होणार असल्याचंही ते म्हणाले. ते म्हणाले, की शिंदे गट दबाव टाकत असल्याच्या बातम्या ऐकल्या. मात्र रमेश लटके यांचं कुटुंब अशा दबावाला कधीही बळी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. करणार नाही
अनिल परब म्हणाले, की ऋतुजा लटके माझ्या संपर्कात आहेत. योग्य वेळी आल्यावर त्या माध्यमांसमोर आपली भूमिका मांडतील. ऋतुजा लटकेंना घाबरण्याचं कारण नाही. जाणुनबुजून त्यांना निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर काढण्यासाठी किंवा आपल्या गटात खेचण्यासाठी हे केलं जातं आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. मात्र, लटके कुटुंब शिवसेनेशी एकनिष्ठ आहे, असंही ते म्हणाले. शिंदे गटाकडून ऋतुजा लटके यांना आमिष दिले जात आहेत. मंत्रिपदाची ऑफर दिल्याचंही ऐकण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र ऋतुजा लटके यांना उमेदवारी देता आली नाही, तर शिवसेनेचा प्लॅन बी तयार आहे का? असा सवाल परब यांना विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले, की आमचे सगळे प्लॅन तयार आहे, ते वेळेनुसार सांगेल. लटकेंना उमेदवारी मिळाली नाही तरी ही जागा लढणारच. शिंदे गट लढू किंवा भाजप लढू, आंधेरीची जागा शिवसेनेची होती आणि शिवसेनेचीच राहील, असा दावाही त्यांनी केला.