मुंबई, 2 नोव्हेंबर : शिटी वाजवणे हे टपोरी मुलांचे लक्षण आहे, असा आपल्याकडे अनेकांचा समज आहे. पण, भारताबाहेर तशी परिस्थिती नाही. विदेशात शिटी वाजवण्याच्या स्पर्धाही होतात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. जपानमध्ये तर शिटी वाजवणे ही एक कला समजली जाते. मुंबई कर निखिल राणे हा या क्षेत्रातील एकमेव भारतीय आहे. त्याची शीळ अनेक जागतिक स्पर्धांमध्ये घुमली आहे. कशी झाली सुरुवात? लहानपणी शिटी वाजवून खोड्या करण्यात निखिल पुढे होते. काही दिवसांनी त्यांचं शिटी वाजवण बंद झालं. कॉलेजमध्ये असताना समूहगीत गायनात निखिल भाग घेत असतं. त्यांना गायनाची आवड होतीच पण बराच गॅप पडूनही आपण शिटी उत्तम वाजवू शकतो हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर निखिलने शिटीच्या माध्यमातून गाणं गाण्यास सुरूवात केली. आपली शिटी वाजवण्याची स्टाईल इतरांपेक्षा वेगळी असावी म्हणून त्यांनी हसत-हसत शिटी वाजवण्यास सुरूवात केली. आता ही निखिल यांची स्टाईल बनली आहे. जागतिक स्पर्धेत घुमली ‘शीळ’ डब्ल्यू डब्ल्यू सी अर्थात वर्ल्ड व्हिसलिंग कॉन्व्हेंशन 2016 मध्ये निखिल सहभागी झाले. या स्पर्धेत सहभागी होणारे निखिल हे एकमेव भारतीय होते. विशेष म्हणजे त्यांनी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यानंतर दोन वर्षांनी 2018 साली पुढील जागतिक स्पर्धा झाली. या स्पर्धेत वाद्य वाजवत शिटी वाजवणे हा निकष होता. निखिल यांनी ती स्पर्धा देखील जिंकली. मुंबईच्या ‘या’ वाद्यांना आहे विदेशातही मागणी, पाहा VIDEO ‘मदर इंडिया’ मार्फत वर्ल्ड रेकॉर्ड त्यानंतर लॉकडाऊनमुळे पुढच्या स्पर्धा झाल्या नाहीत. स्पर्धा नसल्या तरी निखिल स्वस्थ बसले नव्हते. त्यांनी या वर्षी ‘मदर इंडिया’ हा खास कार्यक्रम करत वर्ल्ड रेकॉर्ड केला. त्यांनी मदर इंडियातील प्रत्येक अक्षरापासून तयार होणाऱ्या नावाच्या देशांची यादी बनवली. त्यानंतर त्या देशाचे राष्ट्रगीत त्यांनी शिटी वाजवत गायले. आजपर्यंत कुणालाही न जमलेला हा रेकॉर्ड निखिल यांनी केला. यामध्ये त्यांनी मॉरिशस, ओमान,थायलंड, हंगेरी, इजिप्त, रशिया, इंडोनेशिया, नेपाळ, डेन्मार्क, इस्रायल आणि अमेरिका या देशांची राष्ट्रगीतं शिटी वाजवून गायली. 17 वर्षांचा तरूण करतोय वर्ल्ड रेकॉर्डची तयारी, यापूर्वी झालीय गिनीज बुकमध्ये नोंद, Video माझ्या आईला आणि आजीला मी शिटी वाजवलेलं आवडत नसे. पण याच शिटी वाजवण्यामुळे मी भारताचं प्रतिनिधित्व जागतिक स्तरावर केलं, तेव्हा सगळेच आश्चर्यचकीत झालीत. या प्रकारची स्पर्धा होते हेच कुणाला माहिती नसतं. शिटी वाजवणे हा श्वासाचा खेळ आहे. त्यामुळे मी यासाठी नियमित प्राणायाम, व्यायाम करत असतो. या विषयावरचा लोकांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, असं मत निखिल यांनी व्यक्त केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.