मुंबई, 16 सप्टेंबर : दही हंडी आणि गणेशोत्सवानंतर आता राज्यात दिवाळीही जोरात साजरी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. दिवाळीमध्ये संपूर्ण मुंबईमध्ये रोषणाई केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. ‘आम्ही पण मोठा कार्यक्रम केला आहे, थोडी धाकधुक होती, पण झाला. गणेशोत्सवात अनेक सेलिब्रिटी आले होते, ते मला बोलले आम्ही खूप दुवा केली, त्यांच्यामुळेच इथपर्यंत येऊ शकलो. सरकारबद्दलचं चांगलं वाईट मत बनवण्याची भिस्त अधिकाऱ्यांवर असते. मुंबईत अमुलाग्र बदल घडवायचे आहेत. रस्त्यांच्या क्वालिटीवर लक्ष द्या, पैसे खर्च करतो ते वाया घालवू नका. यामुळे काहींना टीका करण्याची संधी मिळते ती मिळणार नाही,’ असं मुख्यमंत्री अभियंत्यांना उद्देशून म्हणाले. ‘आधी माझ्याकडे अधिकार कमी होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी चहल यांना बोलावलं. साडेपाच हजार कोटीची रस्त्याची काम सुरू झाली आहेत. दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त होईल. मग खड्डे दाखवा आणि बक्षीस मिळवा, असं आपल्याला करावं लागले. ठाणे-नवी मुंबईत जसं सुशोभीकरण केलं, तसं आपणही करावं,’ असं एकनाथ शिंदे यांनी अभियंत्यांना सांगितलं. ‘लोकांना वाटतं हा आपल्यातला मुख्यमंत्री आहे, म्हणून ते फोटो काढायला येतात. विरोधकांना मी अधिवेशनात चांगलं उत्तर देतो. मी सगळं साठवून ठेवलं आहे. वेदांता कंपनीचा विषय खूप चालतोय, अडीच वर्षांमध्ये त्यांनी काही केलं नाही. 2 महिन्यांमध्ये आम्ही प्रयत्न केला पण कंपनीने आधीच जायचं ठरवलं होतं. मी कामातून उत्तर देईन. याविषयी पंतप्रधानांशी बोलणं झालं आहे. राज्यात मोठे प्रकल्प आणण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे,’ असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.