मुंबई, 6 डिसेंबर : मुंबईमधील दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह हे निवासस्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (Dr. Babasaheb Ambedkar) समाजकारणातील योगदान महत्त्वाचे असून भारताचे संविधान घडविण्यात बाबासाहेबांचं फार मोठं योगदान होतं. राजगृह ही पवित्र ऐतिहासिक वास्तू 3 मजली असून आंबेडकरी-बौद्ध आणि दलित जनतेचे एक प्रमुख श्रद्धास्थान, प्रेरणास्थळ आहे. ही पवित्र वास्तू पाहण्यासाठी अनेक लोक दररोज राजगृहाला भेट देतात. या राजगृहाचा इतिहास काय आहे या रिपोर्टमधून माहिती पाहुया. (History of Rajgruha)
राजगृहाच्या बांधकामाची सुरुवात सन 1931 रोजी झाली होती. हे काम सन 1933 मध्ये पूर्ण झाले. या पवित्र वास्तूचे एकूण 3 मजले आहेत. राजगृहात पहिल्या मजल्यावर बाबासाहेबांच कुटुंब राहत असे. राजगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जवळजवळ 50 हजार पुस्तकांचा संग्रह केला होता. त्यावेळी ते सर्वात मोठे ग्रंथालय होते. हे पवित्र राजगृह हे अनेक लोकांचे भेट देण्याचे पवित्र स्थान आहे. अनेक अनुयायी राजगृहाला भेट देत असतात. सन 2013 मध्ये राजगृहाचा समावेश हेरिटेज वास्तूमध्ये झाला.
वाचा : एकनाथ शिंदे यांच्यामुळे संजय राऊत यांची खासदारकी कायम राहिली, सूत्रांची माहिती
डाॅ. आंबेडकरांनी वापरलेल्या अनेक दुर्मिळ वस्तू आहेत
राजगृहाच्या तळमजल्यावरील खोल्यांमध्ये अनेक पुरातन वस्तू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई यांनी वापरलेल्या अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये भांडी, बाथ टब, अनेक जुने दुर्मिळ फोटो, पंख , गरम पाण्याचे यंत्र, पलंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, गौतम बुद्ध यांची प्रतिमा आहे. या सगळ्यांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या खोलीत अभ्यास करायचे तो टेबल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छड्यादेखील आहेत. या खोलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची प्रत तसेच त्यावर चष्मा ठेवण्यात आलेला आहे. या संग्रहालयात बाबासाहेबांचे अस्थिकलशदेखील ठेवण्यात आलेला आहे. याचं राजगृहामध्ये बाबासाहेबांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेले होते, त्यानंतर चैत्यभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वाचा : JOB ALERT: ‘या’ जिल्हातील राष्ट्रीय आरोग्य अभियानात नोकरीची मोठी संधी; लगेच करा अर्ज
दररोज किती लोक राजगृहाला भेट देतात?
राजगृह सेवक उमेश कसबे म्हणाले की, दररोज 200 ते 250 लोक राजगृहाला भेट देतात. महापरिनिर्वाण दिवस तसेच आंबेकर जयंती दिवशी अनेक लोक राजगृहाला भेट देत असतात. राजगृह हे साधारण तीन मजली असून पहिल्या मजल्यावर बाबासाहेबांचं कुटुंब राहत असे. राजगृह बौद्ध समाज, दलीत समाज यांचे श्रधास्थान असून विविध समाजाचे लोक या पवित्र स्थानाला भेट देत असतात.
गुगल मॅपवरून साभार...
राजगृहाला कशी भेट द्याल?
या ऐतिहासिक ठिकाणाला भेट द्यायची असेल तर मुंबईमध्ये दादर पूर्व, 129, खरे घाट मार्ग, हिंदू कॉलनी, मुंबई, महाराष्ट्र 400014 या पत्त्यावर तुम्हाला जायला जायला हवं. दादर स्टेशनजवळून अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर हिंदू कॉलनीमध्ये राजगृह ईमारत आहे. राजगृहाला भेट देण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. सर्वांसाठी हे पवित्र स्थान खुले आहे. मंगळवारी राजगृह बंद असते. सकाळी 10 पासून ते सायंकाळी 6 पर्यंत राजगृहाला भेट देऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News, Mumbai local