मुंबई, 13 जून : शिक्षणाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. अनेक लोक स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी वय उलटून गेल्यानंतरही शिक्षण घेत असतात. वयाची मर्यादा ओलांडली तरिही अनेकांमध्ये शिक्षणाची आवड असते. अशाच एका 43 वर्षीय आईने तब्बल 25 वर्षांच्या गॅपनंतर बारावी पास (12th Board Exam) केली आहे. नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला अन् त्यात या आई उत्तीर्ण झाल्या आहेत. या आईच नाव आहे मोहिनी मोरे. (Mother passed HSC exam after 25 years of gap)
मोहिनी मोरे यांचां विवाह 1996 मध्ये झाला होता. दहावीनंतर लग्न झालं अन् घर-संसाराची जबाबदारी अंगावर पडली. त्यांना शिक्षण हे सोडावे लागलं. मात्र, मोहिनी यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी कायम होती. 2020 साली त्यांनी बारावीचा फॉर्म भरला. मात्र, गॅप सर्टिफिकेट नसल्याने त्यांना परीक्षेला बसता आले नाही. मात्र, निराश न होता त्यांनी पुन्हा एकदा बारावीचा फॉर्म भरला आणि जोमाने अभ्यास सुरू केला.
मोहिनी मोरे म्हणाल्या की, "लग्न झाल्यानंतर संसाराची जबाबदारी माझ्यावर आली. त्यावेळी शिक्षण सोडावे लागले. मात्र, शिक्षण घ्यायचे ही जिद्द मात्र मनात होती. शिकण्याची भूक गप्प बसून देत नव्हती. माझ्या पतीने तसेच माझ्या मुलीने मला प्रोत्साहन दिले आणि कोणताही क्लास न लावता घरीच अभ्यास करुन 25 वर्षांनंतर यश मिळालं."
मोहिनी मोरे बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्यांच्या नातेवाईकांमध्ये आनंद पसरला आहे. स्वतःच्या संसाराचा गाडा व्यवस्थित सांभाळत त्यांनी जोमाने अभ्यास करुन यश संपादित केलं आहे. त्या यशावर त्यांची मुलगी नम्रता मोरे म्हणाली, "जे आईने यश मिळवले आहे ते तिच्या कष्टाचं फळं आहे. आईने घर व्यवस्थित सांभाळत मोठ्या कष्टाने यश मिळवलं आहे, याचा मला खूप अभिमान आहे. मुलगी म्हणून मी आईला अनेक विषयात मदत केली. मात्र, शेवटी हे संपूर्ण प्रयत्न माझ्या आईचेच आहेत."
वाचा : Success Story : ‘रोशनी’च्या यशाने उजाळली घरकाम करणाऱ्यांची 10 बाय 10ची खोली, आईच्या डोळ्यात पाणी!
यशस्वी पुरुषांमागे एक स्त्री असते, असं म्हणतात. मात्र, इथं एका यशस्वी स्त्रीचा मागे त्यांचे पती खंबीरपणे उभे राहिले होते. मोहिनी मोरे यांच्या पतीने त्यांच्या पत्नीची शिक्षणाची आवड ओळखून त्यांना कायम प्रोत्साहितच केले. मोहिनी मोरे यांचे पती मच्छिंद्र मोरे म्हणाले की, "माझ्या पत्नीने जे यश तब्बल 25 वर्षानंतर मिळवलेले यश आहे. त्याबाबत मला तिचा खूप अभिमान आहे.1996 मध्ये लग्न झाल्यानंतर काही घरगुती कारणास्तव तिला शिकणं सोडावं लागलं होतं. मात्र, मला तिची शिक्षणाची गोडी माहीत होती म्हणून मी तीला 12 वीसाठी प्रोत्साहन दिलं. शेवटी ती तिच्या कष्टाने 12 वी पास झाली."
मोरे कुटुंबीय हे एकत्र कुटुंब आहे. मात्र, घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून जोमाने अभ्यास करुन मोहिनी मोरे यांनी 25 वर्षानंतर यश मिळवल्यानंतर त्यांच्या सर्व कुटुंबातील सदस्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. यामध्ये त्यांचा मुलगा, त्यांची सासूबाई सरस्वती केशव मोरे, जाऊबाई मीनाक्षी मोरे यांनीदेखील अभिनंदन केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai News