रत्नागिरी, 26 जानेवारी : मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील निगडे गावानजीक दोन स्वीफ्ट कारची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्यांमधील 9 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन जण गंभीर जखमी असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले आहे.
हा अपघात मुंबई गोवा महामार्गावर निगडे गावानजीक पेट्रोल पंपासमोर मंगळवारी दुपारी झाला. सावंतवाडी येथील शिवलकर कुटुंबीय सावंतवाडी ते मुंबई असे आपल्या ताब्यातील स्वीफ्ट डिझायर कारने प्रवास करत होते. मात्र वाटेतच मुंबई गोवा महामार्गावर खेडमधील निगडे गावानजीक पेट्रोल पंपासमोर ते आले असता समोरून खेड ते चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या स्वीफ्ट कारचा आणि त्यांच्या स्वीफ्ट डिझायर कारमध्ये जोरदार धडक झाली.
या अपघातात शिवलकर कुटुंबातील सहा जण तर स्वीफ्ट कारमधील तीन जण जखमी झाले आहेत.
हेही वाचा - 'असा एकही दिवस जात नाही शीतल...' लेकीच्या आठवणीत डॉ. विकास आमटेंची भावुक पोस्ट
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या काही काळापासून अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. वेगावर नियंत्रण नसल्याने अनेकदा अशा दुर्घटना घडतात. त्यामुळे वाहनचालकांनी याबाबतची खबरदारी घेण्याची गरज वारंवार अधोरेखित होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ratnagiri, Road accident