मुंबई 26 जानेवारी : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची कन्या डॉ. शीतल आमटे यांनी गेल्या 30 नोव्हेंबरला राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यानंतर 26 जानेवारीला शीतल यांच्या जन्मदिवशी वडिलांनी आपल्या कन्येच्या आठवणीने व्याकुळ होत भावुक पोस्ट केली आहे. ‘आज शीतलचा वाढदिवस. आज तू हवी होतीस शीतल. असा एकही दिवस जात नाही, जेव्हा तुझी आठवण येत नाही. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा’. अशा शब्दांत विकास आमटेंनी Facebook वर पोस्ट केली आहे. या भावनिक पोस्टसोबत त्यांनी लेकीसोबतचा आपला एक फोटोदेखील शेअर केला आहे.
आज शीतलचा वाढदिवस. आज तु हवी होतीस शीतल. असा एकही दिवस जात नाही, जेव्हा तुझी आठवण येत नाही. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂 😞 #HappyBirthdaySheetal #happybirthday pic.twitter.com/0q3LstLM5S
— Dr. Vikas Baba Amte (@drvikasamte) January 26, 2021
डॉ. शीतल या आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. डॉ. शीतल आमटे यांनी आनंदवनातील आपल्या राहात्या घरी आत्महत्या केली होती. नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं. ही बातमी सगळ्यांसाठीच धक्कादायक होती. यानंतर त्यांनी हे टोकाच पाऊल का उचललं किंवा त्यांच्यासोबत घातपात झाला का याबद्दलचा तपास सुरु झाला. मात्र, अद्यापही सायबर व फॉरेन्सिक अहवाल आलेले नसून ते अहवाल प्राप्त झाल्यानंतर अधिक स्पष्टता होणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. याप्रकरणात नंतर हेदेखील पुढे आले, की शीतल यांनी याआधीही जून 2020 मध्ये झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. शीतल आमटे या काही वर्षांपासून मानसिक तणावात होत्या. त्या मृत्यूच्या सहा महिन्यांपूर्वीपासून नागपूर येथील मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत असल्याची बाबही समोर आलेली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी काही दिवसांपूर्वी दिली आहे.

)







