रत्नागिरी, 14 मे : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात मुंबईतून कोकणात येणारे प्रवासी कोरोनाबाधित आढळत असल्यामुळे येत्या काही दिवसात कोकणही कोरोनाग्रस्त होण्याची शक्यता वाढली आहे. त्यातच मुंबईतल्या किंवा इतर प्रांतातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळता रेड झोनमधून कोकणात येणाऱ्यांना कोणतीही लक्षणे नसतील तर केवळ त्यांचे नाव, पत्ता घेउन थेट त्यांच्या गावातल्या घरी होम क्वारन्टाइन होण्यासाठी पाठवण्याचे प्रशासनाने ठरवलं आहे. त्यामुळे कोरोना चाचण्याही आता कमी प्रमाणात होणार आहेत .
प्रतिबंधीत क्षेत्रातून येणाऱ्यांना संस्थात्मक क्वारन्टाइन करण्यात येऊन त्यांचे स्वॅब प्राधान्याने घेण्यात येणार आहेत. होम क्वारन्टाइन असलेल्यांनी गावात फिरू नये म्हणून दापोली , मंडणगड या दोन तालुक्यात रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी गावातल्याच तरुणांचे ग्राम कृती दल स्थापन करण्यावर भर दिला आहे. अशा परिस्थितीत कोकणात येऊ इच्छिणाऱ्या मुंबईतल्या प्रवाशांना पासेस देण्याचं काम सुरुच असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी कोकणात परतू लागले आहेत.
काय आहेत प्रशासनासमोरची आव्हाने?
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग प्रशासनाने पहिल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यास सुरुवात केली. महसूल प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणांनी दिवस रात्र मेहनत करुन कोकणात कोरोनाचा शिरकाव रोखण्यात यश मिळवले होते . मात्र काही दिवस उलटताच कोकणातल्या राजकीय नेत्यांकडून मुंबईतल्या कोकणवासीयांना कोकणात आणण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू झाला. त्याचाच परिणाम म्हणून लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबईतून कोकणात येणाऱ्यांची नाव नोंदणी सुरु झाली. त्या आधीपासूनच अनेक जण मुंबईतून छुप्या पद्धतीने अनेक वाटांनी कोकणात दाखल होण्यास सुरुवात झाली होती.
हेही वाचा - व्हायरसला दूर ठेवणारं PPE किट झालं तयार, कोरोनाविरूद्धच्या लढाईत शास्त्रज्ञांना यश
मुंबई, पुणे हे रेड झोन असल्यामुळे या भागातून कोकणात येणाऱ्यांना संस्थात्मक क्वारन्टाइन करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली. शेकडो शाळा, कॉलेजेस , काही हॉटेल्स , वसतीगृहे , विश्रामगृहे यासाठी आरक्षित करण्यात आली. पण मुंबईतून आलेल्यांपैकी ज्यांच्या चाचण्या करण्यात आल्या त्यातले अनेक जण पॉझिटिव्ह आढळण्यास सुरुवात झाली. 14 मे पर्यंत रत्नागिरीत कोरोनाबाधितांची संख्या 74 वर पोहोचली आहे . त्यातल्या दोघांचा मृत्यू झाला आहे, तर सिंधुदुर्गात ही संख्या पाच वर गेली आहे.
या सगळ्या परिस्थितीत मुंबईहून रत्नागिरीत येणाऱ्यांना तब्बल चाळीस हजाराहून अधिक पासेस देण्यत आले अहेत. ते थांबवणे आपल्या नियंत्रणाबाहेर असल्याचे प्रशासनाने म्हटल्यामुळे आता येणाऱ्यांना कोणतीही लक्षणे नसतील तर थेट त्यांच्या गावात होम क्वारन्टाइन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पण गावातल्या काही गावकऱ्यांचा मुंबईतून आलेल्याना अशा प्रकारे थेट घरी पाठवण्याला विरोध होत असल्यामुळे गावागावात आता तणावाचे वातावरणही पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे, मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रत्नागिरी जिल्ह्यातून येणारे फक्त 200 च नमुने रोज तपासण्यात येतील, असं प्रधासनाला कळवलं आहे. त्यामुळे मुंबईतून येणाऱ्या संशयास्पद रुग्णांच्या चाचण्या आता कशा कराव्या? या चिंतेत प्रशासन आहे. त्यामुळे कोकणात कोरोना चाचण्या होण्यासाठी लॅब उभारावी अशी मागणी खासदार विनायक राऊत यानी केली आहे. अशा सगळ्या परिस्थितीत कोकणात येणारे लोंढे थांबले नाहीत तर कोकण कोरोनाच्या विळख्यात अडकण्याची भीती आहे.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.