रायगड, 15 मे : कोरोनाची बाधा न होताही अनेकांना आपला जीव गमवावा लागत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. मात्र हा लॉकडाऊन अनेकांसाठी एक भयावह स्वप्न ठरत आहे. शहरात राहून हाताला काम मिळत नसल्याने जीव जगावण्यासाठी लोकांनी गावचा रस्ता धरला आहे. मात्र अशातच रायगडमधून एक मन हेलावून टाकणार बातमी आली आहे.
मुंबईहून चालत निघालेल्या चाकरमान्याचा वाटेतच मृत्यू झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील रात्री ही दुर्दैवी घटना घडली. पेण तालुक्यातील जिते गावाजवळ एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मोतीराम जाधव असं मृत व्यक्तीचं नाव आहे. मोतिराम जाधव हे कुटुंबासह कांदिवली येथून श्रीवर्धन येथील आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. मात्र वाटेतच त्यांना मृत्यूनं गाठलं.
घराच्या ओढीने निघालेल्या चिमुकल्यांवर वाटेतच वडिलांचा मृत्यू पाहण्याची दुर्दैवी वेळ ओढावली आहे. लॉकडाऊनमुळे चालत निघालेल्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची रायगडमधील ही तिसरी घटना आहे.
दरम्यान, एकीकडे परराज्यातील नागरिकांना शासन रेल्वेने त्याच्या गावी पाठवत आहेत. त्याचप्रमाणे चाकरमान्यांनाही त्याच्या गावी पाठवण्यासाठी शासनाने परिपत्रक काढून त्यांना विशेष रेल्वेने त्वरित पाठवावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माजी आमदार माणिक जगताप यांनी केली आहे.
पेण तालुक्यातील वडखळमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. येथील 9 वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. आजारी या असलेल्या या मुलाला दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्याची स्वॅब टेस्ट करण्यात आली होती. आज या टेस्टचा अहवाल आला. त्यामध्ये या मुलाला कोव्हीड-19 ची लागण झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा - सलग दुसऱ्या दिवशी दोन मोठे अपघात, 3 मजुरांचा जागीच मृत्यू 44 जखमी
या मुलाला पुढील उपचारासाठी नायर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. दुसरीकडे, महाड ग्रामीण रुग्णालयातील परीचारिकेला कोरोनाची लागण झाली आहे. मुरुड तालुक्यातील मिठेखार येथील महिलेचा मृत्यू झाला. सदर महिलेच्या स्वॅब टेस्टिंग रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात नव्याने चार कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तसंच पेण, मुरुड, अलिबाग, महाड या तालुक्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याने कोरोनाने जिल्ह्याला चहुबाजूंनी घेरल्याची स्थिती आहे. त्यामुळे रायगडवासियांची भीतीचं वातावरण आहे.
संपादन - अक्षय शितोळे