मनिष खरात, प्रतिनिधी
हिंगोली, 23 फेब्रुवारी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली आहे. वर्षभर मेहनत गेल्यावर आता विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. मात्र, यावेळी परीक्षा केंद्रावर एक आगळावेगळा प्रकार पाहायला मिळाला. विवाहित महिला परीक्षा केंद्रावर पेपर देत असताना सात महिन्यांच्या बाळाला परीक्षा केंद्राबाहेर झोका करून बाबांनी सांभाळले.
काय आहे संपूर्ण प्रकार -
हिंगोलीत एका महिलेने आपल्या सात महिन्यांच्या बाळाला परीक्षा केंद्राबाहेर साडीचा झोका करून झोपवले आणि बारावी परीक्षेचा पेपर दिला आहे. पेपर संपेपर्यंत या बाळाचा त्याच्या वडिलांनी सांभाळ केला. परीक्षार्थी महिला आणि तिच्या पतीचे कौतुक होत आहे.
सेनगाव तालुक्यातील केंद्रा बुद्रुक येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर परभणी येथील पुनम माधव इंगोले या महिलेचे परीक्षा केंद्र आहे. बारावीची परीक्षा देण्यासाठी पुनम आपले बाळ आणि पतीसह केंद्रावर आल्या. परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षा केंद्राबाहेर झाडाला साडीचा झोका करून बाळाला झोपू घातले आणि यानंतर स्वतः परीक्षा देण्यासाठी गेल्या. दरम्यान, परीक्षा संपेपर्यंत पूनमच्या पतीने बाळाचा सांभाळ केला. दरम्यान हे चित्र पाहून या जोडप्याचं कौतुक होत आहे.
भरारी पथकाचे राहणार लक्ष -
दरम्यान, परीक्षा काळात गैरप्रकार रोखण्याची पूर्ण तयारी परीक्षा विभागाने केली आहे. कॉपी टाळण्यासाठी भरारी पथके, बैठे पथक असणार आहे. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात विद्यार्थ्यांची झडती देखील घेण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Board Exam, Father, HSC Exam, Mother, Small baby