राहुल पाटील, प्रतिनिधी पालघर, 5 जून : शासनाकडून विविध उपाययोजना करुनही रस्ते अपघात थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. अनेकदा समोरच्या चुकीची शिक्षा निष्पाप व्यक्तीला भोगावी लागते. तर बऱ्याचदा स्वतः चालकही अपघाताला आमंत्रण देतात. अशीच एक घटना मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. यात एका मायलेकाचा मृत्यू झाला तर वडील आणि दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. मायलेकीचा जागीच मृत्यू मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणूतील महालक्ष्मी येथील उड्डाणपुलावर भरधाव अज्ञात वाहनाने बाईकला दिलेल्या धडकेत तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलासह आईचा जागीच मृत्यू झाला आहे. तर वडील आणि दोन बहिणी गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. कैरू बारकू डवला, जयविर बारकू डवला (3 वर्ष) यांचा चिरडून मृत्यू झाला आहे. तर बारकू डवला, सुवर्णा डवला, प्राची डवला हे गंभीर जखमी झाले आहेत. हे पाचही जण एकाच बाईकवरून प्रवास करत असून ते पालघर मधील सातिवली येथून मृत जयवीरला सिटीस्कॅन करण्यासाठी धुंदलवाडी येथील रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र, रस्त्यातच काळाने त्यांच्यावर घाळा घातला असून कासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बाईकला धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या महामार्गावर हा भीषण अपघात झाला. वाचा - Latur News : आईला होणारी मारहाण पहावली नाही; पोराने जन्मदात्याला.. लातूर हादरलं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीत अवघातांची मालिका सुरूच असून त्यात अनेकांना जीव गमावा लागतोय. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.