कोल्हापूर, 29 जानेवारी : कोल्हापूर जिल्ह्यात पुणे-बंगळुरू महामार्गावरील किणी टोलनाक्याजवळ काही अट्टल गुन्हेगार आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली होती. आता या प्रकरणातून नवीन माहितीसमोर आली आहे.
किणी टोलनाक्यावजवळ पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये चकमक झाली होती. हे गुन्हेगार राजस्थानमधील कुख्यात 007 बिश्नोई गँगचा गॅंगस्टर होते. या खतरनाक गँगशी दोन हात करून कोल्हापूर पोलिसांनी यशस्वीपणे जेरबंद केलं. या चकमकीत कोल्हापूर पोलिसांनी मोठ्या शिताफिने गॅंगस्टर श्यामलाल पूनिया आणि त्याच्या इतर साथीदारांना जेरबंद केलं.
काय घडलं टोलनाक्यावर ?
कोल्हापूर पोलीस आणि गँगस्टरमध्ये झालेली ही चकमक एखाद्या चित्रपटापेक्षा वेगळी नव्हती. रात्री 9 वाजेच्या सुमारास हे आरोपी किनी टोल नाक्यावर पोहोचले होते. गुन्हेगारांच्या वाहनाला रोखण्याचा प्रयत्न करताच त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांनीही गोळीबार केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर पोलिसांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर देत गॅंगस्टर श्यामलाल आणि त्याचा साथीदार अटक केली.
राजस्थानमधून पळाली होती गँग
राजस्थान पोलिसांनी अनेकवेळा या आरोपींना जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. पण या आरोपींनी तिथुनही आपला सुटका करून घेतली. सुटका करुन घेतलेला बिश्नोई गँगचा गँगलिडर शामलाल पुनीया आणि त्याचे दोन साथीदार कर्नाटकमधील हुबळीमध्ये असल्याची माहिती राजस्थान पोलिसांना मिळाली होती. हे तिन्ही आरोपी कोल्हापूर मार्गे पुण्याकडे जात असल्याची राजस्थान पोलिसांनी संबंधित माहिती कोल्हापूर पोलिसांना देताच अवघ्या काही मिनिटांत सापळा रचत पोलिसांनी आरोपींना जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. पण आरोपींनी थेट पोलिसांवर फायरिंग करत आपली सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. पण कोल्हापूर पोलिसांनी मोठ्या धाडसाने सामना करत गँगस्टरला आधी जखमी केलं आणि त्यानंतर जेरबंद केलं.
बँकांवर दरोडे टाकणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
दरम्यान, बँकांवर दरोडे टाकणाऱ्या एका आंतरराज्य टोळीतील फरार आरोपींना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे, पंधरा जिवंत राउंड, रोख रक्कम आणि कार असा सुमारे साडे सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पुणे-बंगलोर महामार्गावर जवळी सांगली फाटा इथं पोलिसांनी ही कारवाई केली. बाबू कौसर खान,फसाहत खान,नवाजीश अली आणि गुड्डू अली अशी संशयितांची नाव आहेत. या टोळीने महाराष्ट्र,कर्नाटकसह आंध्रप्रदेश तामिळनाडू अशा राज्यातील बँकांना लक्ष केल्याचं तपासात समोर आलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील कळे इथल्या यशवंत बँकेवर वर्षभरापूर्वी दरोडा पडला होता. या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान पोलिसांनी या संशयितांना जेरबंद केलंय. या प्रकरणी टोळीतील काही साथीदारांना कोल्हापूर पोलिसांनी या आधीच ताब्यात घेतलं होतं. गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या या चौघांनी आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने आंध्रप्रदेशमधील मामीदिकुदृ इथल्या एसबीआय बँकेवर दरोडा टाकल्याची कबुली दिली. या चौघांकडून बँक दरोड्याची आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत वर्तवली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.