मुंबई, 2 फेब्रुवारी : आज औरंगाबाद, नागपूर, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ तर नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे. यासाठी सकाळी 8 वाजेपासून पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथमच भाजप आणि महाविकास आघाडी या निवडणुकीत आमने-सामने आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील
नाशिकमध्ये सत्यजित तांबे आणि भाजप बंडखोर शुभांगी पाटील यांच्यात चुरस आहे. शुभांगी पाटील यांना ऐनवेळी भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंड केले. तर सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. शुभांगी पाटील यांना ठाकरे गटासोबतच महाविकास आघाडीनेही पाठिंबा जाहीर केला आहे. तर भाजपने सत्यजित तांबेना छुपा पाठिंबा दिला आहे. येथील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमरावती : भाजप-काँग्रेस-वंचितमध्ये तिरंगी लढत
अमरावतीमध्ये भाजपचे डॉ. रणजित पाटील, काँग्रेसचे धीरज लिंगाडे आणि वंचित बहुजन आघाडीचे अनिल अमलकर यांच्यात तिरंगी लढत आहे. अकोला आणि अमरावतीमध्ये वर्चस्व असलेल्या वंचितच्या उमेदवारांनी जर मते खेचली तर त्याचा फटका काँग्रेसला फटका बसू शकतो.
औरंगाबादमधील परिस्थिती काय?
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदीप सोळुंके यांनी बंडखोरी केली. त्यामुळे विक्रम काळे यांची डोकेदुखी वाढली आहे. तर यानंतर सोळुंके यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली. मात्र, सोळुंके व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपच्या किरण पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. औरंगाबाद मतदारसंघात एकूण 14 उमेदवार रिंगणात आहेत. येथील निकालाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - पुण्यात निकालाआधीच सत्यजीत तांबेंच्या विजयाची पोस्टरबाजी, PHOTOS
ना.गो. गाणार विरुद्ध सुधाकर आडबोले
नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपचे ना. गो. गाणार आणि विदर्भ शिक्षक संघाचे सुधाकर आडबोले यांच्यात चुरशीची लढत आहे. ठाकरे गटाचे गंगाधर झाडे यांना ऐनवेळी माघार घेण्यास सांगण्यात आले होते. यानंतर गंगाधार झाडे यांच्या माघारीमुळे ठाकरे गटाचे शिवसैनिक नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुधाकर आडबोले यांची अडचण होऊ शकते. नागपूर शिक्षक मतदारसंघात एकूण 22 जण रिंगणात आहेत.
कोकणात ज्ञानेश्वर म्हात्रे-बाळाराम दत्तात्रय पाटील आमनेसामने
कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे आणि महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार बाळाराम दत्तात्रय पाटील यांच्यात चुरस आहे. जदयूचे धनाजी पाटील यांच्यासह एकूण 8 उमेदवार रिंगणात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Election, Maharashtra political news, MLC Election, Satyajit tambe