चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी दापोली, 07 जानेवारी : खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अपघात झाला. या अपघाताातून योगेश कदम थोडक्यात बचावले आहे. पण, या भीषण अपघातानंतर टँकर चालक फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेशेडी घाटात रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर हद्दीत रात्री 10 वाजता अपघात झाला. या अपघातात आमदार योगेश कदम हे सुखरूप आहेत. मात्र त्यांचा ड्रायव्हर आणि तीन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. पोलादपूर पोलीस ठाण्यात आमदार कदम गाडीला अपघात करणाऱ्या चालकांवर गुन्हा दाखल झाला असून त्याचा शोध रायगड पोलीस घेत आहेत. (‘योगींनी नाकासमोर मुंबईतून 5 लाख कोटी उडवून नेले’, सेनेचा शिंदे सरकारवर घणाघात) सध्या आमदार योगेश कदम यांची अपघातग्रस्त फोर्ड इंडेवर गाडी पोलादपूर पोलीस ठाण्यात आणली असून या संपूर्ण घटनेची माहिती घेण्याकरता रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः पोलादपूर पोलीस ठाण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते आहे. काय घडलं नेमकं? आमदार योगेश कदम यांच्या गाडीला शुक्रवारी रात्री 10.15 च्या सुमारास रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे अपघात झाला आहे. सुदैवाने आमदार योगेश कदम सुखरूप आहेत. त्यांच्या चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाली. चोळई येथील शासकीय रूग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे.रूग्णालयात आमदार योगेशदादा जातीने उपस्थित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार योगेश कदम हे खेड कडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजिक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली. यानंतर टँकर पलटी झाला आणि चालक पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.