संजय शेंडे, प्रतिनिधी अमरावती, 24 जुलै : आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नाडी समजल्या जाणारी अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेत काँग्रेसचे संख्याबळ जास्त असून सुद्धा माजी मंत्री बच्चू कडू यांनी यशस्वी खेळी खेळत काँग्रेसची 3 मते आपल्याकडे वळवत अध्यक्षपद खेचून आणले आहे. बच्चू कडूंच्या या खेळीमुळे काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांना धक्का मानला जात आहे. आज झालेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत बच्चू कडू गटातर्फे बच्चू कडू स्वतः अध्यक्षपदासाठी तर सहकारातील नेते अभिजीत ढेपे हे उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात होते. बच्चू कडू आणि अभिजीत ढेपे या दोघांनाही 11-11 मते मिळाली तर काँग्रेसचे यशोमती ठाकुर आणि बबलू देशमुख गटाचे उमेदवार माजी आमदार विरेंद्र जगताप आणि हरिभाऊ मोहोळ या दोघांनाही 10-10 मते मिळाली.
काँग्रेसची या निवडणुकीत 3 मते फुटली. हे तिन्ही मतं बच्चू कडू यांच्याकडे वळवली गेली, त्यामुळे माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या गटाला हा जबर धक्का असल्याचे बोलल्या जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा बँकेवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांची एक हाती सत्ता होती. शेतकऱ्यांना आणि संचालकांना त्रास देणाऱ्या हुकूम शहांची हुकूमशाही संपवली, जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या दारी घेऊन जाणार, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.