मुंबई, 28 सप्टेंबर : लग्नाच्या बाजारातील काही दलालांनी आता थेट सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेच्या नावाने लोकांना फसवायला सुरूवात केलीय. म्हणून माईंच्या संस्थेनं अशा सायबर भामट्यांपासून दूर राहा, असं आवाहन केलंय. अनाथांची माय… अर्थात दिवंगत सिंधुताई सपकाळ यांचं समाजकार्य सर्वश्रुत आहे. त्यांनी आजवर शेकडो अनाथ मुला मुलींना आश्रय दिला. नव्हे त्यांची लग्नही लावून दिलीत. अगदी माईंच्या पश्चातही हे समाजकार्य त्यांच्या संस्थेकडून अविरतपणे सुरू आहे.पण काही सायबर भामट्यांनी आता थेट माईंच्या संस्थेच्याच नावाने लोकांची लुबाडणूक सुरू केली.
या दलालांची मोडस ऑपरेंडीही मोठी चक्रावणारी आहे. आमच्याकडे लग्नाच्या मुली आहेत. पण त्यासाठी मला तुम्ही प्रवासखर्च आणि माईंच्या संस्थेसोबत रितसर करार करण्यासाठी 10 ते 11 हजार ऑनलाईन पाठवा, असा रितसर तुम्हाला फोनच येतो. त्यांचे फोन रेकॉर्डिंगही व्हायरल झाले आहेत.
हे ही वाचा : मुंबई कस्टम विभागाची मोठी कारवाई, चॉकलेटमधून तब्बल 19 लाखांची सोन्याची तस्करी
बरं समोरच्याचा विश्वास बसावा म्हणून हे भामटे मुलींचे फेक फोटो आणि प्रोफाइलही तात्काळ व्हाट्सअप करतात. सर्वाधिक धक्कादायक म्हणजे सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमाच्या नावाने फसवणूक सुरू आहे. म्हणूनच संस्थेनं यासंदर्भात रितसर पोलीसात तक्रार दिलीय. अशी माहिती सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सपकाळ यांनी दिली आहे
विशेष म्हणजे माईंच्या संस्थेत आता एकही लग्नाची मुलगी नाहीये, गेल्याच मे महिन्यात 9 मुलींची लग्नं संस्थेनं सामुदायिक विवाहसोहळ्यात लावून दिलीत. म्हणूनच कोणी असं आमच्या संस्थेच्या नावाने फसवणूक करत असेल तात्काळ आमच्याशी संपर्क करा, अथवा पोलीसात तक्रार करा, असं आवाहन संस्थेनं केलंय
माईंच्या संस्थेचे संस्थेचे सीईओ विनय सपकाळ यांनी तर यासंबंधी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. म्हणूनच तुमच्या आजुबाजुलाही ही अशी अनाथ मुलींच्या नावाने फसवणूक होत असेल तात्काळ पोलिसात तक्रार करा असे सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा : 22 व्या वर्षी ड्रिम जॉब, 58 लाखांचा पगार… पण जॉईनिंग आधीच संपलं तरुणाचं आयुष्य
द मदर ग्लोबल फाऊंडेशन या संस्थेने अनेक गरीब मुलींचे लग्न लावून देण्यात मदत केली आहे. त्याचप्रमाणे आम्ही काम करत असून आमच्याकडे लग्नासाठी मुली आहेत, असे सांगून चोरट्यांनी अनेकांकडून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुण्यात देखील अशी फसवणूक होत असल्याची शक्यता विनय सपकाळ यांनी व्यक्त केली आहे. पुण्यासह मुंबई, जळगाव, संभाजीनगर या ठिकाणी देखील प्रकार होत असल्याचं संस्थेने सांगितलं आहे. व्हॉट्स ऍपद्वारे किंवा मोबाईलवरून मॅसेजद्वारे मदतीचे आवाहन करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.