मुंबई, 30 जानेवारी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सध्या चर्चेत आहेत. शेतकरी प्रश्नावर उपोषणाची घोषणा करून नंतर माघार घेतल्याने त्यांच्यावर शेतकरी आंदोलन समर्थकांकडून सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे. अशातच आता शेतकरी नेते अशी ओळख असणारे आणि महाविकास आघाडीच्या सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली आहे.
अण्णा हजारे यांच्यासोबतच्या भेटीबाबत बच्चू कडू यांनी फेसबुक पोस्ट लिहित माहिती दिली आहे. शेतकरी आंदोलनाच्या किंवा त्यानिमित्ताने अण्णांवर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली नसून या भेटीमागील कारण वेगळंच आहे. अण्णा हजारे यांच्यासोबत पूर्वीपासून असलेल्या ऋणानुबंधामुळेच बच्चू कडू यांनी त्यांची भेट घेतल्याचं त्यांच्या पोस्टमधून दिसत आहे.
हेही वाचा - शरद पवारांनी सांगितले नव्या कायद्यांचे दुष्परिणाम
'माझ्या सुरुवातीच्या निवडणुकीत अण्णा हजारे स्वतः माझ्या प्रचाराला आले होते. त्यावेळी आम्ही अण्णांची रक्ततुला करुन प्रचाराचा शुभारंभ केला होता. बर्याच दिवसांपासून अण्णांची भेट झाली नव्हती. आज अहमदनगर दौऱ्यात अण्णांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली व तब्येतीची विचारपूस केली,' असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
माझ्या सुरवातीच्या निवडणुकीत अण्णा हजारे स्वतः माझ्या प्रचाराला आले होते. त्यावेळी आम्ही अण्णांची रक्ततुला करुन... Posted by Bacchu Kadu on Saturday, 30 January 2021
दरम्यान, केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांकडून आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनाच्या समर्थनासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अण्णा हजारे हे उपोषणाला बसणार होते. मात्र भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली मध्यस्थी यशस्वी ठरली आणि अण्णा हजारे यांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anna hazare