अमरावती, 11 फेब्रुवारी : राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना चांदूरबाजार (Chandur bazar) प्रथम वर्ग न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा (two months rigorous imprisonment) सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर बच्चू कडू यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यावर सूड उगविण्यासाठी विरोधकांनी अशापद्धतीने केस बनवल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला. तसेच आपण न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करत असून न्यायासाठी वरच्या कोर्टात जाऊ, अशी भूमिका त्यांनी मांडली. बच्चू कडू नेमकं काय म्हणाले? “आमदारांसाठी 2014 मध्ये एक सोसायटी केली होती. शासनाने त्यावेळी कर्जाची हमी घेतली होती. त्यातून घरे दिली होती. त्याच घरांवर आपण कर्ज काढलं होतं. निवडणुकीच्यावेळी कर्जाची रक्कम त्यावेळी प्रतिज्ञापत्रकात टाकली गेली. पण घर क्रमांक टाकला गेला नाही. ते घर आपण तसं दाखवलंच आहे. पण न्यायालयाने जो चुकीचा निर्णय दिला त्याचं आम्ही स्वागत करत आहोत. न्यायालयाने चुकीचा निर्णय दिला तरी सन्मान करावं लागतं”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. “गुन्हा अचलपूरला घडला. तक्रारदार चांदूरबाजारचा, तर तक्रार आशेगावला करण्यात आली. ज्या ठाणेदाराने एका गरीब माणसाला 20 हजार देवून लुबाडलं होतं त्याला आम्ही आमच्या पद्धतीने समज दिली होती म्हणून त्याने डाव काढला. त्याने दुसरा एक विरोधक पकडला. त्याने तक्रार लिहून घेतली. अशा पद्धतीने ही केस निर्माण केली. याप्रकरणी दोन महिन्याची सजा आणि 25 हजारांचा दंड ठोठावला आहे. पण त्याने काही होणार नाही. आम्ही वरच्या कोर्टात जाऊ. मला आत्मविश्वास आहे. वरंच न्यायालय आम्हाला न्याय देईल, असा विश्वास आहे”, असं बच्चू कडू म्हणाले. तक्रारदार नगरसेवकाने माहितीचा आधिकार कायद्यान्वे माहिती मिळवली बच्चू कडू यांनी मुंबईत 42 लाख 46 हजार रुपयांचा मालकीचा फ्लॅट असतानाही 2014 ची विधानसभा निवडणुकीवेळी या फ्लॅटबद्दलची माहिती निवडणूक आयोगाला दिली नाही, असा आरोप बच्चू कडूंवर होता. याच आरोपांवरुन 2017 मध्ये कडूंविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वे गुन्हा दाखल झाला होता. बच्चू कडू यांच्याविरोधात या प्रकरणी तक्रार करणारे तत्कालीन नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी माहिती अधिकार कायद्यान्वे संबंधित यंत्रणेकडून माहिती मिळवली होती. त्यातून हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. ( घरी रोख रक्कम ठेवण्याचेसुद्धा आहेत खास नियम, जाणून घ्या अन्यथा पडू शकतं महागात ) दरम्यान, बच्चू कडू यांनी त्यावेळी या प्रकरणातील सर्वा आरोप फेटाळले होते. राजयोग सोसायटीने सर्व आमदारांना घर उपलब्ध करुन दिले होते. त्यासाठी बँकेचे 40 लाख रुपये कर्जसुद्धा उपलब्ध करुन देण्यात आले होते. पण कर्जाची परतफेड न होऊ शकल्याने चार महिन्यांच्या आधी ते विकण्यात आल्याचा दावा बच्चू कडूंनी त्यावेळी केला होता. त्यामुळे आपल्यावरील सर्व आरोप खोटे होते, असं स्पष्टीकरण बच्चू कडूंनी 2017 मध्ये केलं होतं. बच्चू कडू यांनी मुंबईत म्हाडाच्या यत्रणेकडून 2011 मध्ये 42 लाख 46 हजार रुपयांत फ्लॅट विकत घेतला होता. बच्चू कडूंनी 19 एप्रिल 2011 रोजी त्या फ्लॅटचा ताबा घेतला होता. त्यानंतर बच्चू कडूंनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये त्यांनी मुंबईतील त्या मालमत्तेविषयी माहिती निवडणूक आयोगाला देणे टाळले होते. त्याच गोष्टीचा धागा पकडत तक्रारदारांनी बच्चू कडूंकडून आयोगाची दिशाभूल झाल्याचा ठपका ठेवत तक्रार केली होती. या प्रकरणी गेल्या पाच वर्षांपासून सुनावणी सुरु होती. अखेर कोर्टाने बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.