औरंगाबाद,26 जानेवारी: एमआयमचे खासदार इम्जियाज जलील यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या तिरंगा रॅलीत एका माहिती अधिकार कार्यकर्त्यावर (RTI) जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. नदीम राणा असे या माहिती अधिकार कार्यकर्त्याचं नाव आहे. खासदार जलील यांच्या कार्यकर्त्यांनी नदीम यांच्या गाडीवर हल्ला केला. यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
इम्तियाज जलील यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका..
खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात नदीम राणा यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप नदीम राणा यांनी केला आहे.
खैंरे आणि जलील आले एकाच मंचावर...
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने औरंगाबादेत एक वेगळेच राजकीय चित्र पाहायला मिळाले. ते म्हणजे एका कार्यक्रमात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील एकाच मंचावर दिसले. एरव्ही एकमेकांवर घणाघाती टीका करणारे चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील एकाच मंचवर आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. एवढेच नाही तर खैरे यांनी जलील यांचा हात हातात घेऊन तो उंचावत 'भारत माता की जय' अशी घोषणाही दिली.
मनसे नेत्यानं भरला MIM च्या खासदाराला दम
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची भूमिका जाहीर केल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सज्जड दम भरला आहे.
'इम्तियाज जलील चुकून लॉटरी लागल्यामुळे तुम्ही खासदार झाला आहात हे आधी लक्ष्यात ठेवा. त्यामुळे या महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या नादाला लागू नका, आताच सांगून ठेवतो. पाहिजे तर अबू आझमी यांना विचारून बघा. तुमचे ओवेसी औरंगाबादमध्ये नाचले होते, त्यांना आम्ही नाच्या म्हणू का?' असा सणसणीत टोला नांदगावकर यांनी लगावला.
'आमच्या अंगावर येऊ नका, अंगावर आला तर शिंगावर घेऊ, प्रयत्न करून तर बघा मग तुम्हाला कळेल. आमच्या नादाला लागण्याच्या फंद्यात पडू नका, नाहीतर खूप महागात पडेल. हैदराबादवरून आला आहात, हैदराबादरमध्येच राहा. इकडे नाय ती नाटकं करायची नाही. राज ठाकरे यांच्याविषयी परत काही बोलला तर अडचणीचे ठरेल', असा इशाराही नांदगावकर यांनी दिला.
काय म्हणाले होते जलील?
राज ठाकरे यांनी मनसेच्या महाअधिवेशनामध्ये मशिदीवरील भोंग्यावरून आक्षेप घेत टीका केली होती. त्यांच्या या विधानावरून 'मशिदीवरुन भोंगे काढण्यासाठीही कायदा आणा. राज ठाकरे इतके वर्ष काय करत होते. त्यांना आताच भोंगे का काढावेसे वाटत आहेत?' असा सवाल करत इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती.
तसंच 'नागरिकत्व सुधारणा कायदा आणला आहे. मुसलमानांनी येथे राहिचे का नाही असं वातावरण केलं आहे. मशिदीवरुन भोंगे काढण्यासाठीही कायदा आणा. काही पुढाऱ्यांना वाटते जनतेला काही काळात नाही. हेच महाशय 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध बोलत होते. या दोन तीन महिन्यात काय झाले माहीत नाही. आताच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांचा निर्णय झाला आहे. त्यामुळे झेंडा बदलला आहे. असे लोक येणार जाणार. पण देश संविधानावर चालतो,' असं म्हणत जलील यांनी मनसेवर जोरदार टीका केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.