मुंबई, 15 एप्रिल: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा (Medical Exams in Maharashtra) पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाने वाढू लागल्याने राज्यसह देशभरातील विविध परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर वैद्यकीय परीक्षाही पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरत होती. या पार्श्वभूमीवर अखेर सरकारी पातळीवर हालचाली झाल्या आणि वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. हेही वाचा - सरकारचा नवा आदेश, कडक लॉकडाऊनमध्ये आणखी 2 विभागांचा अत्यावश्यक सेवेत केला समावेश वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या या परीक्षा आता येत्या जूनमध्ये घेण्यात येणार असल्याचंही शासनाकडून सांगण्यात आलं आहे. तसंच या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल, अशीही माहिती अमित देशमुख यांनी दिली आहे. या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही माझी चर्चा झाली आहे, असंही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.