सुमित सोनवणे, प्रतिनिधी
दौंड, 21 फेब्रुवारी : दौंड तालुक्यातील यवत गावच्या हद्दीत सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेने आपल्या दोन चिमुकल्यासह नवीन मुठा कालव्यात उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
नंदिनी लक्षदीप वांजळे असं या महिलेचं नाव आहे. तर मल्हार 2 वर्षांचा तर मुलगी मधुरा वांजळे ३ वर्षांची आहे. चिमुकल्यासह आत्महत्या केल्याने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदिनी लक्षदीप वांजळे या विवाहितेला सतत फोर व्हीलर गाडी आणि म्हशी घेण्यासाठी दहा ते पंधरा लाख रुपयांची मागणी सासरच्या लोकांकडून होत होती. सततच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेनं टोकाचं पाऊल उचललं. विवाहित महिलेनं दौंड तालुक्यातील यवत गावाच्या हद्दीतील नवीन मुठा कालव्यात उडी मारून आपल्या दोन चिमुकल्यासह आत्महत्या केली.
नंदिनी लक्षदीप वांजळे आणि मल्हार (वय वर्ष २) आणि मुलगी मधुरा वांजळे (वय वर्ष ३) हे तिघे कालव्यातील पाण्यात मृत अवस्थेत आढळून आले आहेत. लग्नात ठरल्या प्रमाणे हुंडा न मिळाल्याने सासरच्या लोकांकडून नंदिनीचा वेळोवेळी छळ सुरू होता, तिच्याकडे पती,सासू,सासरे,नणंद यांच्याकडून लग्नात ठरलेल्या हुंड्यातील रक्कमेपैकी एक लाख रुपये न दिल्याने तिचा मानसिक त्रास सुरू होता. याच त्रासाला कंटाळून अखेर नंदिनीने आपल्या दोन चिमुकल्या सह कालव्यात उडी घेऊन जीवन याञा संपवली.
याबाबत मृत नंदिनीच्या भावाने सासरच्या लोकांविरुद्ध यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक तपास यवत पोलीस करीत आहे.
माहेरी जाण्यापासून रोखले, संतापलेल्या पत्नीने ब्लेडने कापले नवऱ्याचे प्राईव्हट पार्ट!
दरम्यान, झारखंडमधील गिरिजीड जिल्ह्यात एका पत्नीने रागाच्या भरात आपल्या नवऱ्याच्या प्राईव्हट पार्टवर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
झारखंडमधील गिरिजीड जिल्यातील विष्णुगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत पती आणि पत्नी वादाची भयावह घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून संतापलेल्या पत्नीने नवऱ्याचे प्राईव्हट पार्टवर ब्लेडने वार केले. ब्लेडने वार केल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या पतीला तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून रिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. डॉक्टर आणि स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार पतीच्या प्राईव्हट पार्टच्या 60 टक्के भाग कापला गेला आहे.
पत्नीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पतीने सांगितलं की, 'माझी पत्नीही माझ्यासोबत राहण्यास इच्छूक नाही. दोनच दिवसांपूर्वी ती माहेरावरून परत आली होती. पण पुन्हा तिने माहेरी जाण्यासाठी हट्ट धरला होता. माहेरी जाण्यावरूनच आमच्यामध्ये वाद झाला.' हा वाद इतका विकोपाला गेला की, दोघांमध्ये मारामारी झाली. रागाच्या भरात पत्नीने ब्लेड घेतली आणि नवऱ्याच्या प्राईव्हट पार्टवर सपासप वार केले. ब्लेडने वार केल्यानंतर पती रक्तबंबाळ झाला आणि जागेवरच कोसळला. तर त्याच्या पत्नीला याबद्दल विचारले असता तिने सांगितलं की, 'मला परिक्षेसाठी माहेरी जायचं होतं. पण त्याने नकार दिला होता. त्यामुळे आमच्यात भांडण झालं.'
सासरच्या आणि माहेरच्या मंडळीचे मौन
या प्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, 'जखमी झालेल्या पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याने आपल्या जबाबामध्ये पत्नीने प्राईव्हट पार्टवर ब्लेडने वार केल्याचं सांगितलं आहे. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला रिम्समध्ये हलवण्यात आलं आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पत्नीचीही चौकशी केली जाणार आहे.'
या घटनेची माहिती मिळताच बगोदरच्या रुग्णालयात लोकांची एकच गर्दी जमा झाली. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री या दाम्पत्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यानंतर संतापलेल्या पत्नीने रागाच्या भरात हे कृत्य केलं. जखमी पतीची प्रकृती स्थिर आहे. परंतु, या प्रकरणावर महिलेकडील आणि सासरच्या मंडळींनी काही बोलण्यास नकार दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.