मुंबई, 28 फेब्रुवारी: गेल्या तीन दिवसांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati) मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आझाद मैदानावर (Azad Maidan) उपोषणाला बसले आहेत. आज तिसऱ्या दिवशी संभाजीराजे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांची शुगर कमी होत असल्याचं समजतंय. संभाजीराजे यांच्या प्रकृतीची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांच ब्लड प्रेशर, शुगर कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांना आम्ही इंजेक्शन घेण्यास सांगितलं आहे. मात्र ते इंजेक्शन घेण्यास देखील तयार नाही,असंही डॉक्टर म्हणालेत. तसंच त्यांनी लवकरात लवकर ट्रिटमेंट घ्यावी असा सल्ला दिला आहे.
डॉक्टर म्हणाले की, गेल्या 60 तासांपासून ते आमरण उपोषण करत आहेत. त्यांची शुगर आणि ब्लड प्रेशर कमी झालं आहे. सोबतच हृदयाचे ठोके वेगाने पडत आहेत. आम्ही शुगर लेव्हल वाढवण्यासाठी त्यांना इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र ते उपोषणावर असल्यानं त्यांनी ते देखील घेण्यास नकार दिला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
कालपासून संभाजीराजे यांना तीव्र डोकेदुखीचा त्रासही जाणवत आहे. डॉक्टरांनी कालच सलाइन लावण्याचा सल्ला दिला. मात्र संभाजीराजेंनी सलाइन लावून घेण्यास नकार दिला. कोणत्याही प्रकारचे औषधे घेण्यास संभाजीराजे यांनी नकार दिल्याचं समजतंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.