13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला 20 वर्षांचा सक्षम कारावास

13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला 20 वर्षांचा सक्षम कारावास

बलात्कार प्रकरणातील दोषीला ही शिक्षा सुनावण्यात आल्यानं स्त्री संघटनांनी याचं स्वागत केलं आहे.

  • Share this:

किशोर गोमाशे, प्रतिनिधी

वाशिम, 25 फेब्रुवारी : वाशिम शहरातील एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार आणि अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना 12 जानेवारी 2018 मध्ये घडली होती. या प्रकरणी अखेर दोषी नंदू उर्फ गजानन वामन भिंगारदिवे या 50 वर्षीय नराधमाला 20 वर्ष सश्रम कारावास आणि 12 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ही शिक्षा तदर्थ अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयालयाच्या न्यायमुर्ती डॉ.रचना नेहरा यांनी सुनावली असून,अत्याचार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने एवढी मोठी शिक्षा दिल्यानं अनेकांनी समाधान व्यक्त केलं आहे.

वाशिम शहरात घटनेच्या दिवशी दुपारी 3. 30 वाजता पीडित मुलगी ही तिच्या घराच्या आवारात खेळण्यास गेली होती मात्र सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिची शोधाशोध केली असता, ती नंदू भिंगारदिवे या आरोपीच्या घराच्या वरच्या मजल्यावर घाबरलेल्या अवस्थेत दिसून आली. तिच्या आईने विचारपूस केली असता, पीडितीने सर्व घटनाक्रम आईला सांगितला.

त्यानंतर आईने वाशिम पोलीस स्टेशनला 13 फेब्रुवारी 2018 रोजी फिर्याद दाखल केली त्यावरून आरोपीविरुद्ध भादंवि 376 ( आय ), 377 तसंच पोक्सो कलम 4, 12 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. तपास अधिकारी अस्मितामनोहर यांनी न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलं.

सरकारी पक्षातर्फे 4 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सबळ पुराव्यांमुळे तदर्थ अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी आरोपीला कलम 376( आय ) नुसार 20 वर्ष सक्तमजुरी आणि 20 हजाराचा दंड ठोठावला.

याप्रकरणी सहाय्यक सरकारी वकील माधुरी मिसर यांनी सरकारी पक्षाच्यावतीने काम पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून तृप्ती पाटील यांनी कामकाज पाहिले. बलात्कार प्रकरणातील दोषीला ही शिक्षा सुनावण्यात आल्यानं स्त्री संघटनांनी याचं स्वागत केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2020 11:36 PM IST

ताज्या बातम्या