ठाणे, 21 फेब्रुवारी : घर बसल्या ॲानलाईन शॉपिंगचा पर्याय बहुतेक जण निवडतात. पण एका मुंबईकरावर हा ॲानलाईन शॉपिंगचा पर्याय जीवावर बेतले होता. olx वर गाडी विकत घेण्याची जाहिरात देणाऱ्या व्यक्तींना संपर्क करून दुचाकी आणि चार चाकी वाहन दाखवण्याच्या बहाण्याखाली मुंबईतील निर्जनस्थळी नेऊन पीडित व्यक्तीला मारहाण करीत लुटलाचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबईतील वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी तामिळनाडू राज्यातून 2 आरोपींना अटक केली आहे.
मोबाईलच्या एका क्लिकवर कुठेही बसून ॲानलाईन शॉपिंगचा पर्याय आज अनेकजण निवडताना दिसतात. रोज कोट्यावधींचे व्यवहार ॲानलाईन शॉपिंगद्वारे केले जातात. मात्र, मुंबईत एका मुंबईकराला हाच ॲानलाईन शॉपिंगचा पर्याय चांगलाच महागात पडलाय. जहांगीर युनूस शेख या पीडित व्यक्तीने olx या संकेतस्थळावर बजाज एव्हेंजर मोटार सायकल घेण्यासाठी जाहिरात देऊन स्वतःचा मोबाईल क्रमांक सुद्धा दिला होता. काही दिवसांनी आपल्याकडील बजाज मोटारसायकल विकण्यासाठी आपण इच्छुक असल्याचा फोन जहांगीरला आला होता.
गाडी पाहून व्यवहार पूर्ण करण्यासाठी कोकरी आगार, म्हाडा चाळी जवळ जहांगीर शेख यास गाडी विकणाऱ्याने बोलावले पण गाडी विकणारे गाडी विकायला नाही तर जहांगिरला लुटायला आले होते.
गाडी दाखवण्याच्या बहाणे ४ आरोपींनी कोकरी आगार येथील निर्जन स्थळी जहांगीरला नेऊन जबर मारहाण करुन जहांगीरला कळण्याआधीच त्याच्या गळ्यातील ५० हजार रुपये किंमतीची १७ ग्राम वजनाची सोन्याची चेन घेऊन आरोपी फरार झाले. घडलेल्या प्रकाराची जहांगीरने वडाळा टीटी पोलीस ठाण्यात तक्रारार दाखल केली.
पोलिसांनी लगेच तपासाला सुरुवात करत सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली आणि आरोपी तामिळनाडूला फरार झाल्याचं कळताच पोलिसांच्या विशेष पथकाने तामिळनाडू इथं जाऊन सुरेश पद्मनाभन इसिकी तेवर (वय १९ ) आणि फुलपंडी मरुगण (वय १९ ) या दोन आरोपींना अटक केली.
या प्रकरणी आणखी 2 आरोपी फरार असून पोलीस त्यांचा
शोध घेत आहे. मात्र, ॲानलाईन शॉपिंग करताना विशेष करुन OLX सारख्या संकेतस्थळावर कोणतीही वस्तू विकत घेताना किंवा विकताना खबरदारी घ्यावी कारण जहांगीरचे नशीब बलवत्तर होते म्हणून तो वाचला. नाही तर त्याच्या जीवावर ही ॲानलाईन शॉपिंग बेतली असती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.