धुळे, 14 सप्टेंबर : अनेक कंपन्या सर्वसामान्य नागरिकांना ज्यादा पैशांचा मोबदला देण्याचं आमिष दाखवत पैशांची गुंतवणूक करण्यास भाग पाडतात. इतके लाख रुपये भरले तर इतक्या दिवसांमध्ये तुम्हाला दुप्पट-तिप्पट पैसे करुन मिळेल, असे आमिष सर्वसामान्य गुंतवणूकदारांना दाखवलं जातं. पण सर्वसामान्य नागरिकांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असं आवाहन वळोवेळी पोलिसांकडून केले जाते. पण तरीही सर्वसामान्य माणसं आमिषाला बळी पडतात. धुळे जिल्ह्यातील आणि गुजरातमध्ये वास्तव्यास असलेल्या काही महाराष्ट्रातील बांधवांसोबत असंच काहीसं घडलं आहे. खान्देशातील चार हजार पेक्षा जास्त गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. गुजरात राज्यातील सुरत येथील कंपनीने महाराष्ट्रातील नागरिकांना लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खान्देशातील सर्वसामान्य नागरिकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला गेला आहे. जवळपास 4 हजार जणांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी धुळे आर्थिक गुन्हा शाखेकडे सुरत येथील शुकुल ग्रुप ऑफ कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ( …मग अजितदादांना मुख्यमंत्री करा, सुप्रिया सुळेंची एकनाथ शिंदेंना ऑफर! ) याप्रकरणी पहिल्या गुन्ह्यात 17 कोटी रुपयांपेक्षा अधिकची फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे. संपूर्ण गुन्ह्याची व्याप्ती ही 75 कोटींपेक्षा अधिक असल्याचा पोलिसांना अंदाज आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. तर चार संशयित आरोपी हे फारर आहेत. आरोपींनी गुंतवणूकदारांना शेअर मार्केट आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक करुन मोठा परतावा देण्याचे आमिष दिलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.