सोलापूर, 30 जून: भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे (BJP MLC) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. गाडीवर दगड फेकल्याने गाडीची काच फुटून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत झालेली नाहीये. गाडीवर दगड फेकणारा तो व्यक्ती कोण होता याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र, आज दुपारी गोपीचंद पडळकर यांनी राजकीय नेत्यांवर टीका केल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
अज्ञात व्यक्तीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्यागाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. सोलापूर येथील मड्डी वस्ती येथे त्यांच्या गाडीवर हल्ला कऱण्यात आला आहे. सोलापूरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला. त्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे.
या घटनेनंतर गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं, सकाळपासून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात माझ्या बैठका सुरू आहेत. त्यानंतर मड्डी वस्ती येथील बैठकीला मी पोहोचलो. ही बैठक झाल्यावर मी गाडीत बसून निघालो होतो त्याचवेळी एका व्यक्तीने गाडीवर हल्ला केला. सोलापूर येथे माझा कुणासोबतही वाद नाहीये.
माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मला गोळ्या जरी घातल्या तरी मी घाबरणार नाही. गाडीच्या पुढे मोठा दगड करण्यात आला. गाडीची काच फुटली आहे. मला आणि माझ्या सहकाऱ्यांना कुठलीही दुखापत झालेली नाहीये.
शरद पवारांवर दुपारी केली होती टीका
भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांवर टीका करत आहेत. शरद पवार, संजय राऊत यांच्यावर सातत्याने पडळकर टीका करत आहेत. आज दुपारी सुद्धा शरद पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, शरद पवार हे मी लहान असल्यापासून ऐकतोय की ते पंतप्रधान होणार आहेत. मागील 30 वर्षांपासून ते भावी पंतप्रधान आहेत. त्यांना भावी पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा आहेत. साडेतीन जिल्ह्यांच्या बाहेर त्यांची पार्टी नाही. दिल्लीत हे नेते एकत्र जमले हे म्हणजे असं झालं की रात गेली हिशेबात, पोरगं नाही नशिबात अशा शब्दांत पडळकर यांनी टीका केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Gopichand padalkar