मुंबई, 10 ऑगस्ट : राज्यात पावसाने कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात थैमान घातले आहे आहे. मागच्या 24 तासांता कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा येथे सर्वाधिक 330 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. (Maharashtra Rain) घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी 200 मिलिमीटपेक्षा जास्त पाऊस पडल्याने नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भातही मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले.
दरम्यान राज्यातील पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या भागात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याचबरोबर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, कोल्हापूर, अकोला, अमरावती, गोंदिया या भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर बुलडाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच विदर्भात संततधार सुरू आहे.
हे ही वाचा : काँग्रेस पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर नाराज, नाना पटोलेंनीही केला 'त्या' जागेवर दावा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर काल (दि.09) काहीसा ओसरला असल्याने किंचीत नद्यांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने मंगळवारीही (ता. ९) धुमाकूळ घातला. किनारी भागात वादळी वारे वाहत होते. वाशिष्ठी, जगबुडी, बावनदी, काजळी, अर्जुना नदीची पाणीपातळी कमी झाली असली तरी इशारा पातळीच्या दिशेने नद्या वाहत आहेत.
खानदेशात दोन दिवसांपासून मध्यम ते जोरदार पाऊस झाला. काही भागांत नाल्याकाठच्या जमिनी खरडून गेल्या. नाशिक जिल्ह्यात सटाणा व मालेगाव तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतजमिनींसह पिकांचे मोठे नुकसान झाले. खरिपाच्या पिकांसह डाळिंब, पूर्वहंगामी द्राक्ष बागांना फटाका बसणार आहे.
पुणे जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. वीर, भामा आसखेड दोन धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माढा तालुक्यात पावसाने हजेरी लावली.
हे ही वाचा : मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण दोऱ्या कुणाकडे? शिवसेनेचा शिंदेंना सवाल
मराठवाड्यातील हिंगोली, परभणी जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस झाला. हिंगोली, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील अनेक मंडळांत पावसाचा जोर होता. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यात पावसाचे सत्र सुरूच आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.
मध्य महाराष्ट्र राधानगरी 200, महाबळेश्वर 190, शाहूवाडी 150, लोणावळा 140, कोपरगाव 120, आजरा, वेल्हे प्रत्येकी 80, चोपडा, पाटण, कागल, प्रत्येकी 70, कोल्हापूर 60, मालेगाव, पन्हाळा, पौड, . प्रत्येकी 50 नांदगाव, भुसावळ, हातकणंगले, शिरोळ प्रत्येकी 40, जळगाव, भोर, गडहिंग्लज, एरंडोल, सातारा, चाळीसगाव, नेवासा, पारोळा, शिरूर, वडगाव मावळ, सटाणा, बागलाण, दिंडोरी, शिरपूर, कळवण, मिरज, देवळा, चिंचवड, कडेगाव, वाळवा, सांगली प्रत्येकी 30 मिमी पावसाची नोंद झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai rain, Pune rain, Rain fall, Rain flood, Weather forecast