मुंबई, 02 ऑगस्ट : राज्यात यंदा पावसाने जून महिन्यात दडी मारल्याने पाऊस होईल का नाही अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु जुलै महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. कोकण, मध्यमहाराष्ट्र, विदर्भात पावसाने जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावली. दरम्यान हवामान विभागाकडून या आणि पुढच्या महिन्याच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दोन्ही महिन्यात समाधान सरासरीपेक्षा 106 टक्के पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. (Maharashtra Rain)
राज्यात झालेल्या पावसाने काही जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या पावसाने 100 च्या वर गावांचा संपर्क तुटला होता. याचबरोबर शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे पुढच्या काही दिवसांत पडणाऱ्या पावसाने पुन्हा नुकसान होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
हे ही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात औरंगाबादमध्ये पोलिसांत तक्रार
राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात 106 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी वार्तालापात दिली. दरम्यान, कोकणात सर्वसाधारण, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर सरासरीपेक्षा जास्त राहील, असेही त्यांनी सांगितले.
महापात्रा म्हणाले, या दोन महिन्यांत देशभरात सामान्य पाऊस पडेल. ९४ ते १०६ टक्के पावसाची शक्यता असून पश्चिम मध्य भारत, उत्तर पश्चिम भारत आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य, पूर्वेत्तर भारतात मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतीय राज्यात मात्र उर्वरित राज्यापेक्षा अतिवृष्टी होईल. दरम्यान, ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांतील अंतिम टप्प्यातील पावसाचा अंदाज वर्तविण्यासाठी १९७१ ते २०२० या कालावधीतील सांख्यिकीचा वापर करण्यात आला.
हे ही वाचा : संजय राऊत अटकेत तरीही ‘रोखठोक’ टीका कायम; सामनाच्या अग्रलेखात आज काय?
कमी दाबाचे पट्टे वाढले…
महापात्रा यांनी सांगितले, २०१८ ते २०२२ या कालावधीचा अभ्यास केल्यानंतर असे दिसून आले की, कमी दाबाच्या पट्ट्यांची संख्या वाढली आहे. मात्र या पट्ट्यांचा दीर्घ कालावधी झाल्याने कमी दिवसांत जास्त पाऊस, असे प्रमाण वाढले.
कोल्हापुरात यलो अलर्ट
बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात पाऊस पडण्यासाठी कोणतीही पूरक स्थिती नाही. त्यामुळे राज्यात काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकणासाह कोल्हापूरला (३, ४ ऑगस्ट) यलो अलर्ट देण्यात आला आहे.