मुंबई, 22 जुलै : राज्यात कोरोनाचा कहर काही थांबवण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे राज्यात वारंवार लॉकडाऊन घेण्याची वेळ आली. मार्च महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. सगळे व्यापार आणि व्यवसाय बंद असल्यामुळे मोठं आर्थिक संकट नागरिकांसमोर उभं राहिलं आहे. अशात लॉकडाऊन आणि अनलॉकिंगनंतर आता पुन्हा लॉकडाऊन होणार नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
माध्यमांशी बोलताना यावेळी राजेश टोपे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सल्ल्याचंही स्वागत केलं आणि त्यांना प्रतिक्रिया दिली. आम्ही कोरोनाच्या टेस्ट वाढवू. प्रत्येकाची कोरोना चाचणी होईल असा प्रयत्न सुरू असल्याचंही टोपे म्हणाले. लॉकडाऊननंतर अनलोकींगनंतर आता पुन्हा लॉकडाऊन होणार नाही तर जास्तीत जास्त गोष्टी सुरूच केल्या जातील असं टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
सरकार याकडे गांभीर्याने विचार करत आहे. जीम आणि अनेक व्यवसाय सुरू करण्यावर आमचा विचार सुरू असल्याचं टोपे यांनी सांगितलं. शॉपिंगमॉल सुरू करण्यासंदर्भातसुद्धा विचार केला जाणार आहे. दरम्यान, मुंबईत दूरच्या उपनगरांतून नोकरीसाठी प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची सहनशक्ती बुधवारी सकाळी अखेर संपली. नालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांनी थेट रेल्वे ट्रॅकवर उतरत रेल रोको आंदोलन केलं.
लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे साईमंदिर उघडणार का? शिर्डीच्या भयावह परिस्थितीचा आढावा
सरकार आता सामान्यांसाठी रेल्वे सुरू करणार का, असा प्रश्न विचारल्यावर लोकांची मागणी रास्त आहे पण सोशल डिस्टन्सिंगचं काय, असं म्हणत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी थेट उत्तर द्यायचं टाळलं.
राज्यात आता पुन्हा लॉकडाऊन करणार नाही, असं स्पष्ट करताना आरोग्य मंत्र्यांनी लोकलसेवा सुरू करण्याचा निर्णय सीएम घेतील, असं म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चेंडू टोलावला. Unlock सुरू झालं, खासगी कार्यालयं सुरू झाली पण लोकल सेवा सामान्यांसाठी सुरू झाली नाही. त्यामुळे नालासोपाऱ्यात एसटीची वाट पाहून वैतागलेल्या चाकरमान्यांनी थेट रेल्वे रुळावर उतरून रेल रोको आंदोलन केलं.