जालना, 12 सप्टेंबर: मी पुन्हा येईन.. असं सांगत 2 दिवसांत सर्व व्यवस्थित झालं पाहिजे, या शब्दात जिल्हा कोविड रुग्णालयातील टॅबलेट व्हिडिओ कॉलिंग सुविधेतील त्रुटींबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी अधिकाऱ्यांना चांगलाच खडसावलं.
हेही वाचा...खूपच भयंकर! संतापलेल्या मॅनेजरनं कर्मचाऱ्याच्या बोटाचं तुकडंच पाडलं
जिल्हा कोविड रुग्णालयातील नवीन 40 बेडच्या ICU वार्डाचा टोपे यांच्याहस्ते आज (शनिवारी) उद्घाटन करण्यात आलं. यावेळी कोविड वार्डात उपचार घेत असलेल्या रुग्णांना आपल्या नातेवाईकांशी बोलता यावं, यांच्या तब्येतीची विचारपूस करता यावी यासाठी जालना जिल्हा कोविड रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या टॅबलेट व्हिडिओ कॉलिंग सुविधेची आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी पाहणी केली. यावेळी टोपे यांनी स्वतः टॅबलेटच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलवरून कोविड ICU वार्डात उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला.
दरम्यान, व्हिडिओ कॉलिंग सुविधेत अनेक तांत्रिक त्रूटी आढळून आल्याने टोपे चांगलेच संतापले. कोविड हॉस्पिटलमधील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यात व्यवस्थित संवाद झाला पाहिजे. एखादा चेंबर घेऊन तिकडे यासाठी चांगली व्यवस्था करा. 2 दिवसांत सर्व व्यवस्थित झालं पाहिजे. सोमवारी मी स्वतः पुन्हा येईन आणि चेक करेल, असा सज्जड दम देखील राजेश टोपे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना भरला.
'लिक्विड ऑक्सिजन' आत्मनिर्भरतेचा जालना पॅटर्न
दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरसचा (coronavirus)प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात राज्यात ऑक्सिजनची कमरता भासत असल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागत असल्याचं दुर्दैवी चित्र समोर आलं आहे. 'लिक्विड ऑक्सिजन' आत्मनिर्भरतेचा जालना पॅटर्न मात्र कोरोनाबाधित रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरताना दिसत आहे.
'News 18 लोकमत' नं चालविलेल्या श्वास गुदमरतोय मोहिमेची अखेर राज्य सरकारने दखल घेतली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा आरोग्य यंत्रणेनं कंबर कसली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि सोयीसुविधांचा नियोजन करण्यात येत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा जिल्हा असल्यानं कुठलीही उणीव भासणार नाही याची काळजी घेतली जात आहे. जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेकडून याबाबत कटाक्षानं दक्षताही घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाबाधित रुग्णांच्या व्हेंटिलेटरसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनसाठी जालन्यात सीएसआरमधून (CSR) मराठवाड्यातील सर्वात मोठा 'लिक्विड ऑक्सिजन' प्लांट उभारण्यात आला आहे. एकाचवेळी 20 हजार किलो साठवणूक क्षमता असून महिको सिड्स कंपनीनं यासाठी सीएसआरमधून 50 लाखांचा खर्च केला आहे. 'लिक्विड ऑक्सिजन' आत्मनिर्भरतेचा जालना पॅटर्न राज्यभर चालवण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा...देशात पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होण्याची शक्यता, जाणून घ्या कारण
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पटांगणात उभारण्यात आलेल्या या लिक्विड ऑक्सिजन प्लांटमुळे मनुष्यबळ आणि वेळेची बचत होत आहे. ऑक्सिजनचा प्रेशर स्थीर राहून रुग्णांना नवसंजीवनी मिळत आहे. त्यामुळे जालन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूदरात कमालीची घट झाल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, 'लिक्विड ऑक्सिजन' आत्मनिर्भरतेचा जालना पॅटर्न कोरोनाबाधित रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरत असून इतर जिल्ह्यांनी देखील याचा आदर्श घेतला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.