मुंबई, 13 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) दोन वर्षांनंतर आज मंत्रालयात (Mantralaya) दाखल झाले. कोविड -19 संसर्ग आणि स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे गेली दोन वर्षे त्यांना मंत्रालयात येता आलं नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी प्रवास करणंही अत्यत कमी केलं होतं. त्यामुळे राज्याचं प्रशासकीय कामकाज गेली दोन वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवास्थान (Varsha Bungalow) आणि सह्याद्री अथितीगृहातूनच केलं होतं. राज्य मंत्रिमंडळाच्या मंत्रालयात झालेल्या बैठकांनाही मुख्यमंत्री व्हिडीयो काँनफर्सिंगद्वारे उपस्थित होते. प्रशासनाला कोणतीही कल्पना न देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अचानक मंत्रालयात दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात अचानक दाखल झाल्यामुळे मंत्रालयातील तळ मजल्यापासून सातव्या मजल्यापर्यंत प्रशासकिय कर्मचाऱ्यांची धावा धाव सुरू झाली.
मंत्रालयातील सुरक्षा रक्षकही सतर्क झालेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात दाखल झाल्यामुळे आता मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयातूनच राज्य सरकार आणि प्रशासनाचा कारभार सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात विविध विभागांना भेटी दिल्या आणि कामकाजाविषयी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली तसेच सूचनाही दिल्या. मंत्रालयात दाखल होताच मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना फुलं वाहून अभिवादन केले. यावेळी पुराभिलेख संचालनालय यांच्यातर्फे मंत्रालय त्रिमूर्ती प्रांगणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एक सुंदर प्रदर्शन लावण्यात येत आहे, त्याची पाहणी करून सूचनाही दिल्या.
मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनीही आपल्या भेटीस आलेल्या मुख्यमंत्र्यांची तब्येतीची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी दाखविलेल्या आपलेपणामुळे व प्रत्यक्ष कामकाजाविषयी केलेल्या सुचनांमुळे उत्साह दुणावल्याची प्रतिक्रिया गृह विभागातील कर्मचारीअश्विनी राम धावणे यांनी दिली. याच विभागातील प्रगती विकास मोरे यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी, ‘कशा काय बऱ्या आहात ना?’ अशा शब्दांत विचारपूस केली. विधि व न्याय विभागातील सहायक कक्ष अधिकारी प्रियंका गावडे आणि त्यांच्या सहकारी म्हणाल्या, आमच्या विभागाला भेट देणारे मुख्यमंत्री ठाकरे पहिलेच मुख्यमंत्री असावेत. त्यांनी अगदी साधेपणाने विचारपूस केली. कामाची चौकशी केली. त्यांच्या भेटीने आम्हाचाही उत्साह वाढला आहे. त्यांनी पहिल्याच वर्षी जागतिक महिला दिन- 8 मार्च रोजी आम्हा सर्वांना आपुलकीने पत्र आणि फुल देऊन आश्चर्यचकीत केले होते. त्यांची आजची भेटही अशीच आश्चर्यचकीत करणारी आहे.
कर्मचाऱ्यांशी चर्चा त्रिमूर्ती प्रांगणातील प्रदर्शनाची तयारी पाहून मुख्यमंत्री प्रथम मंत्रालयातील विस्तारित इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सामाजिक न्याय विभागाच्या कर्मचाऱ्यांना भेटले. त्याठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त केलेल्या सजावटीचे त्यांनी कौतुक केले तसेच बाबासाहेबांच्या प्रतिमेचेही पूजन केले. कर्मचाऱ्यांशी बोलून त्यांच्या कमाविषयीही त्यांनी माहिती घेतली. वाचा : राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर, सल्ला देत लगावला सणसणीत टोला यानंतर मुख्यमंत्री महसूल विभाग तसेच सामान्य प्रशासन विभाग, गृह विभाग, विधी व न्याय अशा विभागात प्रत्यक्ष आतमधून फिरले. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी मुख्य सचिवांनी मंत्रालयात 6 एप्रिलपासून फाईल्स आणि कागदपत्रे यांचे संगणकीकरण तसेच स्वच्छता, अनावश्यक कागदपत्रांची विल्हेवाट याची मोहीम सुरु असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी देखील पेपरलेस कामांवर भर देताना तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त उपयोग करावा अशा सूचनाही केल्या. मुख्यमंत्र्यांनी संकल्प कक्ष तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील कक्षांना देखील भेट देऊन पाहणी केली व कामकाजाविषयी महत्वपूर्ण सूचना केल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात येत नसल्याने विरोधी पक्षाकडून सातत्याने त्यांच्यावर टीका होत होती. पण आता मुख्यमंत्र्यांच्या तब्येत ठणठणीत असल्याने ते मंत्रालयात दाखल झाले. मंत्रालयात दाखल होताच त्यांनी विविध विभागांचा दौरा सुद्धा केला आणि कर्मचाऱ्यांसोबत चर्चा देखील केली.