मुंबई, 13 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या टीकेवर शरद पवारांना विचारले असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले, एखादी व्यक्ती वर्ष, सहा महन्यात एखाद्यावेळी काही तरी बोलते. तेव्हा त्यांना फारसे गांभीर्याने घ्यायचे नसते. ते म्हणाले की मी कधीच छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलत नाही. परवाच माझे छत्रपती महाराजांवर मी अर्धातास भाषण केले.
शरद पवार म्हणाले, असं आहे की, पहिल्यांदा एखाद-दुसरी व्यक्ती वर्ष-सहा महिन्यात एखादे स्टेटमेंट करते त्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नसते. दोन -तीन विषय माझ्या वाचणात आले. शिवाजी महाराजांचं नाव मी घेत नाही असा उल्लेख त्यांनी केला. दोनच दिवसांपूर्वी मी अमरावतीला होतो. अमरावतीचं तुम्ही माझं भाषण मागवलं तर त्याच्यात शिवाजी महाराजांचं योगदान यावर माझं कमीत कमी 25 मिनिटांचं भाषण आहे. अनेक गोष्टी मी त्यात बोललो.
वाचा : दोन वर्षांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात, शासकीय कर्मचाऱ्यांची तारांबळ, पाहा PHOTOS
सकाळी उठल्यावर वृत्तपत्र वाचायची मला सवय आहे पण त्यासाठी मला लवकर उठावं लागतं, त्यामुळे खूपदा वृत्तपत्र न वाचल्यानंतर वक्तव्य करत असतील तर जे वाचत नाहीत त्यांच्यावर काय बोलायचे असं म्हणत शरद पवारांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
शरद पवार पुढे म्हणाले, प्रश्न काय आहे लोकांपुढे? महागाईबद्दल ते काहीच बोलले नाही. त्यांच्या भाषणावर काय बोलायचे. माझे मत काय होते सोनियांजींस्वता सोनियाजींना सत्तेचा या मोठ्या पदापर्यंत जायचे नव्हते. त्या स्वत:च बोलल्या होत्या त्यानंतर त्यांनीच सर्वांना एकत्र यावे असे सांगितले. पंतप्रधान होण्याबद्दल हे मी आधीच बोललो आहे. त्यांनी वाचन केले नाही त्यामुळे ते असे बोलले. त्यांचा पक्ष संपत चालला आहे. याची नोंद जनतेने घेतली आहे. मी नास्तीक आहे असे ते म्हणाले. माझ्या निवडणुकीचा नारळ कुठे फुटतो हे बारामतीकरांना विचारा. प्रबोधनकारंचे वाचन त्यांनी केले असते तर असे बोलले नसते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (12 एप्रिल) ठाण्यात उत्तरसभा घेतली. या सभेत राज ठाकरेंनी शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतरही नेत्यांवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर शरद पवार यांनी संभाजी ब्रिगेड, सीग्रेड सारख्या संघटना काढल्या, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
"या देशामध्ये हजारो वर्षांपासून जात आहे. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या जातीबद्दल अभिमान होता. पण 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. तो जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेश निर्माण करायला लावला. आमच्या मुलांची माथी भडकवली गेली. इतिहास चुकीचा सांगितला गेला म्हणे. शरद पवार सांगतात म्हणे इतिहास चुकीचा सांगितला गेला. राष्ट्रवादीने संभाजी बिग्रेड, सीग्रेड सारख्या अनेक संघटना काढल्या. या संघटना 1999 सालानंतर कशा आल्या? योगायोग? योगायोग नाही, यांनीच काढल्या", असा घणाघात राज ठाकरेंनी केला.
"मी पुण्याला शरद पवारांची एक मुलाखत घेतली होती. तेव्हा याबाबत प्रश्न विचारला होता. मी त्यांचं वय बघून त्याबाबत जास्त खोलावर गेलो नाही. पण शरद पवार राष्ट्रवादीच्या जन्मापासून ज्या-ज्यावेळेला भाषण करतात तेव्हा महाराष्ट्र कुणाचा तर शाहू-फुले-आंबेडकरांचा असं म्हणतात. मान्यच आहे. पण त्याअगोदर हा महाराष्ट्र सर्वप्रथम कुणाचा असेल तर तो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. पण शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना दिसत नाहीत", असं दावा राज ठाकरे यांनी यावेळी केला.
"शरद पवार म्हणता मी जातीवादीचे राजकारण करतो. मी लोकांना भडकावतो. राष्ट्रवादी काँग्रेसने बोलावे, राज ठाकरे भूमिका बदलतो म्हणून. सोनिया गांधी या परदेशी पंतप्रधान देशाला चालणार नाही, हे म्हणणारे बाळासाहेब ठाकरे होते. त्यानंतर हाच धागा पकडून शरद पवार बाहेर पडले. 1999 ला बाहेर पडले आणि निवडणुकीचा निकाल लागला आणि परत काँग्रेसमध्ये गेले आणि कृषीमंत्री झाले. मी कोणती भूमिका बदलली?", असा सवाल राज ठाकरेंनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.