भाजपच्या 'या' नेत्याने शिवसेनेच्या मतदारसंघात जाहीर केली स्वत:चीच उमेदवारी, वाद होणार?

भाजपच्या 'या' नेत्याने शिवसेनेच्या मतदारसंघात जाहीर केली स्वत:चीच उमेदवारी, वाद होणार?

युतीच्या जागावाटपाआधीच भाजपच्या नेत्याने शिवसेनेच्या मतदारसंघात स्वत:ची उमेदवारी जाहीर केल्याने युतीत वाद होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 13 सप्टेंबर : विधानसभेतील जागावाटपावरून भाजप आणि शिवसेनेत खलबतं सुरू आहेत. मात्र जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. असं असताना कोल्हापूरच्या कागलमधील भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी थेट आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे.

राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागलमध्ये राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. कागल मतदारसंघ हा आतापर्यंत युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे राहिला आहे. यावेळी मात्र कागलवर भाजपकडून दावा सांगितला जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या समरजितसिंह घाटगे यांनी तर थेट स्वत:च्या उमेदवारीची घोषणा करत कागल शहरामधून रॅली काढली आहे.

युतीच्या जागावाटपाआधीच भाजपच्या नेत्याने शिवसेनेच्या मतदारसंघात स्वत:ची उमेदवारी जाहीर केल्याने युतीत वाद होण्याची शक्यता आहे. कागल शहरात समरजित सिंह घाटगे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केलं आहे. त्यामुळे तालुक्यातील शिवसेनेचे नेते आता काय भूमिका घेणार, हे पाहावं लागेल.

राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांसमोर आव्हान

राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे सध्या कागल मतदारसंघातून आमदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अनेक गड कोसळले. मात्र कागलवर पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांचंच वर्चस्व पाहायला मिळालं होतं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने छापाही टाकला होता. त्यानंतर मतदारसंघातील राजकीय वातारवरण ढवळून निघालं होतं. मुश्रीफ यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यानंतर तालुक्यात दोन मतप्रवाह समोर आले होते. विरोधकांनी मुश्रीफांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, तर भाजप प्रवेश न केल्याने सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

VIDEO: दारूच्या अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या पोलिसालाच महिलांनी केली मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2019 01:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading