अॅम्ब्युलन्स मिळेना, नवजात अर्भकाला घेऊन दुचाकीवरून डॉक्टर आणि नर्सनी गाठलं रुग्णालय

अॅम्ब्युलन्स मिळेना, नवजात अर्भकाला घेऊन दुचाकीवरून डॉक्टर आणि नर्सनी गाठलं रुग्णालय

लॉकाडऊनच्या काळात एका नवजात अर्भकाला रुग्णालयात नेण्यासाठी गाडी न मिळाल्यानं दुचाकी वापरली. यामुळे अर्भकाला वेळेत रुग्णालयात नेता आले आणि त्याच्यावर उपचार करता आले.

  • Share this:

अलिबाग, 11 एप्रिल : कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद आहेत. कोरोनामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठ्या संख्येनं दक्ष रहावं लागत आहे. अशा परिस्थिती ते सर्वतोपरी मदत करत आहेत. कर्तव्यात कोणत्याही प्रकारची कसूर राहणार नाही याची काळजी घेत असताना दिसत आहे. यातच आरोग्य कर्मचाऱ्यांबद्दल अभिमान वाटावा अशी एक घटना अलिबागमध्ये घडली. लॉकाडऊनच्या काळात एका नवजात अर्भकाला रुग्णालयात नेण्यासाठी गाडी न मिळाल्यानं दुचाकी वापरली. यामुळे अर्भकाला वेळेत रुग्णालयात नेता आले आणि त्याच्यावर उपचार करता आले. डॉक्टरांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे चिमुकल्याचे प्राण वाचले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अलिबागमध्ये राहणाऱ्या श्वेता या प्रसूतीसाठी शहरातील एका नर्सिंग होममध्ये दाखल झाल्या होत्या. पहिल्या प्रसूतीवेळी एकाच दिवसात बाळाचा मृत्यू झाला होता. त्याच्या धक्क्यामुळे यावेळी त्या थोड्या तणावाखाली होत्या. दरम्यान यावेळी त्यांची सिझेरियन करून प्रसूती झाली. प्रसूती झाल्यानंतर काही वेळातच मुल काळं निळं झालं. त्याला श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात येताच पुढच्या उपचारासाठी इतरत्र हलवण्याची गरज होती.

नर्सिंग होममध्ये एनआयसीयूची सोय नसल्यानं बाळाला दुसऱ्या रुग्णालयात न्यावं लागणार होतं. मात्र लॉकडाऊनमुळे तात्काळ अॅम्ब्युलन्स मिळणं कठीण होतं. यावेळी प्रसंगावधान राखत नर्सिंग होममधील डॉ. चांदोरकर यांनी रुग्णालयातील एका नर्सला सोबत घेत बाळाला दुचाकीवरून रुग्णालयात नेलं. त्याठिकाणी एनआयसीयूमध्ये लगेच उपचार कऱण्यात आले.

हे वाचा : कोरोनालढ्यात मुंबईच्या IIT ने केली कमाल; जवळ न जाता रुग्णांची तपासणी करण्यासाठी

बाळाची प्रकृती त्यानंतर सुधारली आणि सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नवजात बाळाला दुचाकीवरून रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढचे उपचार वेळेत सुरू झाले. त्यानंतर पुन्हा बाळाची फेरतपसाणी डॉ. चांदोरकर यांनी केली. तेव्हा अवघ्या एक दिवसाच्या त्या चिमुकल्यानं डॉक्टरांचं बोट घट्ट पकडलं होतं.

कोरोनामुळे एकीकडे रुग्णालयात स्वत:चा जीव धोक्यात घालून डॉक्टर, नर्स अहोरात्र झटत आहेत. या सर्वांना त्यांच्या कुटुंबापासूनही दूर रहावं लागत आहे. मात्र याही परिस्थितीत लोकांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची धडपड सुरू आहे.

हे वाचा : नाशिक: उच्च अधिकाऱ्याची आत्महत्या, पोलिस स्टेशनमध्येच झाडली गोळी

संपादन - सूरज यादव

First published: April 11, 2020, 6:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading