कर्ज 24 लाखांचं अन् वसूल केले 74 लाख, तरीही घरात घुसून मारहाण; बारामतीत सावकराची गुंडगिरी

कर्ज 24 लाखांचं अन् वसूल केले 74 लाख, तरीही घरात घुसून मारहाण; बारामतीत सावकराची गुंडगिरी

या व्यवहारापोटी प्रताप, विक्रम, राकेश आणि रुपेश यांनी फिर्यादीच्या दुकानात येत त्यांना वारंवार मानसिक त्रास दिला.

  • Share this:

बारामती, 11 एप्रिल :  24 लाखांच्या बदल्यात 74 लाख रूपयांची रक्कम दिल्यानंतरही खंडणीसाठी घरात घुसून मारहाण करणाऱ्या चौघां सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  खंडणीची मागणी केल्या प्रकरणी बारामती  शहर पोलीस स्टेशनला या चौघांविरोधात खंडणीसह घरामध्ये घुसून मारहाण करणे, महाराष्ट्र सावकारी अधिनियम आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी यातील मुख्य आरोपीस अटक केली असून त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. इतर तीन आरोपींचा शोध सुरू आहे.

बारामती शहरातील मुख्य आरोपी प्रताप रमेश जाधव,   विक्रम रमेश जाधव, राकेश रामकिसन वाल्मिकी आणि रुपेश रामकिसन वाल्मिकी या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

शहर पोलीस स्टेशनला  अनिकेत दिपक चंकेश्वरा (वय 35) यांनी याबाबत फिर्याद दिली असून चंकेश्वरा यांचा शहरात कार डेकोर करणेचा व्यवसाय आहे. 2015 मध्ये बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या प्रताप जाधव याने वेगवेगळ्या व्यक्तिंच्या नावाने चंकेश्वरा यांना 24 लाख 61 हजार रुपयांची रक्कम व्याजाने दिली होती. या बदल्यात चंकेश्वरा यांनी व्याजासह 32 लाख 83 हजार रुपये प्रताप जाधव याला परत केले होते. या रक्कमेव्यतिरिक्त मागील 25 महिन्यांपासून ते एप्रिल 2020 अखेरपर्यंत चक्रवाढ व्याज म्हणून चंकेश्वरा यांनी  प्रताप  जाधव यास 42 लाख रुपये दिले असून आजवर 74 लाख 83 हजार रुपयांची रक्कम परत केली होती. शिवाय  सुरक्षेपोटी जळोची हद्दीतील जमीन गट क्रमांक 160 मधील पाच गुंठ्याचा बिगर शेती प्लॉट खरेदीखत  करून दिला. व्याजासह पैसे परत केल्यांतर जळोची येथील हा जमीन व्यवहार परत नावावर उलटून द्यायचे ठरले होते.

हेही वाचा - मोठी बातमीः CBSC बोर्डाचा 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा पॅटर्न बदलणार

परंतु, प्रताप जाधव याने तो व्यवहार पूर्ण केला नाही. त्याच्या फॉर्च्युनर मोटारीत या चौघांनी फिर्यादीला बळजबरीने बसवून शहरातील माळावरची देवी येथे नेवून, चाकूचा धाक दाखवत, 'तुझा पुण्यातील आंबेगाव बुद्रूक येथील फ्लॅट माझ्या नावावर कर, तरच तुझा जळोचीतील पाच गुंठ्याचा प्लॉट व तुझ्याकडून घेतलेले नऊ कोरे धनादेश तुला परत करीन', अशी धमकी आरोपींनी दिली होती.

तसंच, 'आंबेगावचा फ्लॅट नावावर केला नाही तर तुला मी जिवंत सोडणार नाही, तुझ्यावर व तुझ्या कुटुंबावर काही व्यक्तींना पुढे करून खोटी अ‍ॅट्रॉसिटी करेन', अशी धमकी दिली. त्यामुळे चंकेश्वरा यांनी आंबेगाव बुद्रूक येथील फ्लॅट व त्यासोबतचे पार्किंग प्रताप जाधव याच्या नावावर खरेदी खत करून दिले.

या फ्लॅटच्या कर्जोपाटी 30 लाख 81 हजारांची रक्कम प्रताप जाधव याने भरावी, त्यातून उरलेली 14 लाख 17 हजारांची रक्कम चंकेश्वरा यांना परत करायचे असे ठरले होते. त्यामुळे ही 14 लाख 17 हजाराची रक्कम फिर्यादीच्या खात्यावर आली असता ती खंडणी म्हणून दे, अशी मागणी प्रताप जाधव याने केली.

हेही वाचा - मुंबईतल्या या हॉटस्पॉटमध्ये कोरोना रोखणं खरं आव्हान, हे PHOTO बघून येईल अंदाज

या व्यवहारापोटी प्रताप, विक्रम, राकेश आणि रुपेश यांनी फिर्यादीच्या दुकानात येत त्यांना  वारंवार मानसिक त्रास दिला. घरात घुसत हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. गेल्या महिन्यातही खंडणीचा गुन्हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या प्रताप जाधव याच्यावर शहर पोलीस ठाण्यात खंडणी, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल होता. शहरातील डॉ. बबबनराव  निंबाळकर यांच्याकडे त्याने 50 लाखांची खंडणी मागितली होती.

तर डॉ. निंबाळकर यांच्याकडील कर्मचारी यास जातिवाचक शिवीगाळ केली होती. जमीन व्यवहारातूनच ही घटना घडली होती. त्यानंतर महिनाभराच्या आतच प्रताप जाधव याच्यावर खंडणी व सावकारीचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

 

संपादन - सचिन साळवे

First published: April 11, 2020, 4:04 PM IST
Tags: baramti

ताज्या बातम्या