मुंबई, 4 एप्रिल : ‘हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे…आपण लढणार आणि जिंकणार आहोत. माझा माझ्यापेक्षाही तुमच्यावर विश्वास आहे. माझे वडील बाळासाहेब ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे आत्मविश्वासासारखं दुसरं बळ नाही, आज आत्मविश्वासाची गरज आहे,’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक इशाराही दिला आहे. ‘तुम्ही घऱाबाहेर पडताना स्वच्छ रुमाल तोंडाला बांधून बाहेर पडा. भाजी मार्केट 24 तास खुली असतानाही गर्दी का करताय? कोरोना आपली परीक्षा बघतोय, त्याच्यासमोर गुडघे टेकता कामा नये. लढायला आम्ही मागे पुढे पाहात नाही. मात्र लोकांनीही शिस्तीचं पालन करणं गरजेचं आहे. 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन संपवायचं की नाही, हे पूर्णपणे लोकांवर अवलंबून आहे,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Lifting of lockdown after April 14 depends on people: Maha CM
— Press Trust of India (@PTI_News) April 4, 2020
दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या प्रत्येक दिवशी वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लोकांना संयमाचं आवाहन केलं, पण समाजात दुही माजवणाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. ‘समाजात काही विकृत व्हायरस आहेत. समाजात दुही माजवणाऱ्यांना माझ्या कायद्याच्या कचाट्यातून कुणीही वाचवू शकणार नाही,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हेही वाचा- मदरस्याची जागा आयसोलेशन वार्डसाठी देणार, मौलाना हारिस दस्तगीर यांची घोषणा ‘मरकजवरून राज्यात आलेल्या सर्वांचा शोध लावला आहे. ते सर्वजण विलगीकरण कक्षात आहेत. पण अजूनही कोणी बाहेर फिरत असेल तर सर्वांनीच जबाबदारी घेऊन असा कोणी आढळल्यास त्याबाबत प्रशासनाला माहिती द्यायला हवी. काही मुल्ला, मौलवीही माझ्या संपर्कात…त्यांच्याशी बोलून सूचना दिल्या आहेत,’ अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.