ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 23 मार्च: माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख नेहमी म्हणायचे की, “जे जे नवे ते ते लातूरला हवे”. आता त्यांचे मूळ गाव असणाऱ्या लातूर जिल्ह्यातील बाभळगावात पाणी प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी अशीच एक नवी योजना आखण्यात आली आहे. गावातील नळांची जोडणी स्वित्झर्लंडच्या पद्धतीने करण्यात येत आहे. त्यामुळे गावात सर्वांना शुद्ध पाण्याचा समान पुरवठा होणार आहे. हर घर जल योजनेतून नळ जोडणी लातूर तालुक्यातील बाभळगावला जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजनेसाठी एक कोटी 96 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या योजनेअंतर्गत गावातील प्रत्येक घराला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा म्हणून स्वित्झर्लंड टेक्नॉलॉजी पद्धतीने नळ जोडण्याचे काम केले जात आहे. बाभळगावच्या पहिल्या महिला सरपंच प्रिया मस्के यांनी सरपंच पदावर विराजमान झाल्यापासून गावात विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत.
गावाला पाणीटंचाई मुक्त करण्याचा प्रयत्न नव्या योजनेचे घरोघरी नळ जोडणी करून पाणी देणे आणि गावाला पाणीटंचाई मुक्त करणे हेच ध्येय आहे. प्रत्येक कुटुंब अंगणवाडी, शाळा, दवाखाना यासह घरांना एच.डी.पी.ई पाईपलाईन असून यामध्ये नळजोडणी करण्यात येत आहे. त्यामुळे गावातील सर्व घरांना समान पाणीपुरवठा होईल. यासाठी एम.डी.पी पाईप वापरून नळाची जोडणी केली जाते. Success Story: अपयशानंतर केला जोमानं अभ्यास, लातूरची मुलगी बनली थेट न्यायाधीश, पाहा Video कशी आहे स्वित्झर्लंड टेक्नॉलॉजी? या पद्धतीमध्ये पाईपलाईनसाठी अखंड पाईप वापरला जातो. इलेक्ट्रिक कॉईल्स द्वारे एलबो आणि टी वापरून घरापर्यंत सव्वा इंची पाईप दिला जातो. यामध्ये प्रत्येक कनेक्शनला वेगळा फेयरवेल वॉल दिला गेला आहे. पाईपलाईन वर कुठल्याही स्वरूपाचा दाब पडला अथवा अन्य काही अवजड वस्तू पडली तरी तो पाईप फुटत नाही. नालीतील अस्वच्छ पाणी पाईपलाईनमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास निर्माण होणारा धोका या माध्यमातून टाळता येतो. गावामध्ये आठशे पन्नास नळ जोडणी आतापर्यंत पूर्ण झाली असून यासाठी वर्षाला 1100 रुपयांची पाणीपट्टी आकारण्यात येते, अशी माहिती उपसरपंच गोविंद देशमुख यांनी दिली.