ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 18 एप्रिल : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत झालेल्या वन परीक्षक अधिकारी परिक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला. या परीक्षेत लातूर जिल्ह्यातील गंगापूर गावातील सह्याद्री बिर्ले यांनी राज्यातील ओबीसी प्रवर्गांमधून मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांनी मुलींच्या एकूण यादीमध्ये 9 वा क्रमांक पटकावलाय. शिवणकाम करणाऱ्या महिलेच्या या मुलीनं हे यश कसं मिळवलं पाहूया कसा झाला प्रवास? सह्याद्रीचं प्राथमिक शिक्षण हे गंगापूरच्या जय किसान प्राथमिक विद्यालयात तर माध्यमिक शिक्षण हे नवोदय विद्यालय बीडमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी कऱ्हाडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली. शाळेच्या अभ्यासाबरोबरच अवांतर वाचनाची आवड होती. थोर विचारवंतांच्या चरित्रामधून प्रेरणा मिळाली.डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि महात्मा गांधी यांचे विचार आत्मसात करुन ते अंगीकृत करण्याचा निर्धार केल्याचं सह्याद्रीनं यावेळी सांगितलं.
माझी आई गेल्या 25 वर्षांपासून शिवणकाम करते. या माध्यमातून तिने माझं संगोपन केलं आहे. आईनं मला सतत प्रोत्साहन दिलं. माझं मनोबल वाढवलं. त्यामुळे आज मी या हे यश मिळवू शकले. माझ्या कष्टाचं चीज झालंय, अशी भावना सह्याद्रीनं व्यक्त केली. अपयश पहिली पायरी सह्याद्री यापूर्वी यूपीएससीची तयारी करत होत्या. या परीक्षेत त्यांना तीन वेळा अपयश आले. या अपयशानंतरही त्यांनी निराश न होता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. अखेर त्यांच्या या कष्टाचं चीज झालं. स्पर्धा परीक्षांचं वेळापत्रक निश्चित नसल्यानं मानसिक स्थैर्य लाभत नव्हते. त्यावेळी आईनं मला मोठा आधार दिला, असं त्यांनी यावेळी सांगितलं. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी विप्रोमधील नोकरी सोडली, पहिल्याच प्रयत्नात मारली बाजी वनपरीक्षक अधिकारी म्हणून काम करत असताना वनसंवर्धन आणि पर्यावरणाचे समतोल राखत काम करण्याची इच्छा आहे, असं सह्याद्री यांनी यावेळी स्पष्ट केलं.