अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 14 एप्रिल : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदाचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. या परीक्षेतही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील मोर्ची अनगर या गावाच्या अभयराज नंजुडे यांनी या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत सहावा क्रमांक पटकावला आहे. अभयराज यांनी ‘लोकल 18’ शी बोलताना आपल्या यशाचं रहस्य सांगितलं आहे. दणदणीत शैक्षणिक पार्श्वभूमी अभयराज यांचे दहावीपर्यंत शिक्षण हे अनगर,मोहोळ मधील शंकरराव पाटील विद्यालयात झाले. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणारा अभयराज यांनी दहावीमध्ये 96 टक्के मार्क्स मिळवले होते. त्यानंतर त्यांनी लातूरच्या दयानंद सायन्स कॉलेजमध्ये अकरावी-बारावीचे शिक्षण घेतले. बारावीला लातूर बोर्डात पहिला येण्याचा पराक्रमही त्यांनी केला. त्यानंतर पुण्यातील सीओईपी या प्रसिद्ध महाविद्यालयातून त्यांनी कॉम्पुटर इंजिनिअरची पदवी मिळवली.
विप्रो कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून दोन वर्ष काम केल्यानंतर प्रशासकीय सेवेत जाण्याचं लक्ष्य त्यांना खुणावू लागले. यावेळी त्यांनी 2020 पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पहिल्याच प्रयत्नात राज्यात सहावा येत त्यांनी घवघवीत यश मिळवलं असून त्यांची रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. काय आहे यशाचं रहस्य? ‘आई सुनंदा आणि वडील सिद्धाराम यांचा मला कायम सपोर्ट होता. मला निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य होतं. त्याचबरोबर चांगल्या मित्राची असलेली संगत हे माझ्या यशाचं सिक्रेट आहे,’ असं अभयराज यांनी सांगितले. परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम आणि पुस्तकांची यादी तसेच पूर्वी झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यावर भर दिला होता. रोज 16 तास अभ्यासासाठी देऊन त्यांनी हे यश मिळवलं आहे. हर्षल लवंगारे, सुशील बारी,भूषण देशमुख, हर्षल देसाई यांच्या मार्गदर्शनाचा या यशात मोठा वाटा असल्याचं अभयराज यांनी सांगितलं. आईनं दागिने गहाण ठेवून दिले शिक्षणाला पैसे, शेतकऱ्याची लेक झाली वनाधिकारी, पाहा Video अभयराज हे उत्तम लेखक असून त्यांनी ‘यशस्वी भरारी’ या पुस्तकाचे लेखनही केलं आहे. विद्यार्थ्यांना लातूर पॅटर्नवर आधारित टेक्निक्स, ट्रिक्स आणि लॉजिक याचं मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. ‘वनसेवेत नवे प्रयोग करण्यासाठी मी प्रयत्नशील असेल. त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी आणि भारतीय वन सेवेतील परीक्षाही देणार आहे, असं त्यांनी सांगितलं.