ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी, लातूर, 15 मे: जात्यावर दळण दळीते, सुपात गोंधळ घालीत अशी पारंपरिक जात्यावरील गीते 21 व्या शतकात आता लुप्त होऊ लागली आहेत. पूर्वीप्रमाणे जात्याची घरघर आता रोज ऐकू येत नाही. शहरी भागात तर जात्याची घरघर पूर्णतः बंद झाली आहे. मात्र ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न लातूर जिल्ह्यातील येलमवाडी येथे आजही दिसून येत आहे. येथील महिलांनी एकत्र येत जात्यावर डाळ बणवून विकण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे जात्यावरच्या डाळींना मागणीही मोठी आहे. पारंपारिकतेला व्यवसायाची जोड लातूर जिल्ह्यातील येलमवाडीत बाजारातील वाढती मागणी लक्षात घेऊन जात्यावरील डाळी तयार केल्या जात आहेत. कविता वाडीवाले यांनी गावातील पंधरा महिलांना एकत्र करून हा व्यवसाय सुरू केला आहे. गावामध्येच तूर हरभरा यासोबत इतर कडधान्ये शेतकऱ्यांकडून थेट विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करून त्याची डाळ तयार केली जाते. याला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. महाराष्ट्रामधील मोठ्या शहरांमध्ये जात्यावरील डाळ असे वाचल्यानंतर ग्राहकाची पसंती मिळत असल्याचे कविता वाडीवाले सांगतात.
दरवर्षी साडेसात लाख रुपयांची उलाढल या डाळीच्या माध्यमातून दरवर्षी साडेसात लाख रुपयांची उलाढाल होते. यामुळे ग्रामीण भागात उन्हाळ्यात महिलांच्या हाताला काम मिळत आहे. प्राथमिक स्तरावर सध्या 15 महिला यामध्ये काम करत आहेत. अजून काही महिला यामध्ये जोडल्या जातील, असे कविता वाडीवाले यांनी सांगितले. जातं ग्रामीण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग पूर्वीचा काळ वेगळा होता. विद्युतीकरण कुठेच नव्हते. यातच ग्रामीण भागात शेत शिवारातून निघालेले धान्य जात्यावर दळून पूर्वीच्या लोकांना कसदार अन्न मिळत होते आणि त्या वेळेची पिढी सुदृढ आणि सक्षम असायची. खरे तर पूर्वीच्या काळात जात्यावरच्या डाळी, दळण या ग्रामीण महाराष्ट्र राज्याच्या परंपरेची व संस्कृतीची साक्ष देत होत्या. सध्याच्या काळात खेड्यापाड्यात असणारी जाती व जात्यावरील डाळ भरडणे काही प्रमाणात ग्रामीण भागातून कालबाह्य झाले आहे. मात्र चाकुर तालुक्यातील येलमवाडी या गावातील महिलांनी संस्कृती जपण्यासोबत यालाच आपला व्यवसाय बनवला आहे. Video : संपूर्ण देशात शिजणाऱ्या लातूरच्या डाळीचं वैशिष्ट्य माहिती आहे? जात्यावरची गाणी पूर्वी पहाटे घरा-घरातून जात्याचा आवाज यायचा. सोबत जात्यावरील गाणी असायची. स्त्रिया आपल्या भावना गीताच्या माध्यमातून व्यक्त करायच्या. सडा-रांगोळी, स्वयंपाक, जात्यावर दळणे इत्यादी नेहमीची कामे करताना पारंपरिक गाणी असायची. आजही जात्यावरील प्रसिद्ध ओव्या लोकांना भूरळ घालतात. येलमवाडीतील महिलांनी ही संस्कृती जपली आहे. असे आहे जातं कडधान्य दळून त्याची डाळ तसेच बारीक पीठ करण्यासाठी जात्याचा वापर केला जातो. जाते वर्तुळाकार गोल दगडाचे असते. त्यामध्ये दोन तळ्या असतात. खालची तळी ही स्थिर आणि जड असते. वरच्या तळ्याला कडेला एक उंच लाकडी खुंटी असते. ही खुंटी हाती धरून वरची तळी घडाळ्याच्या विरुद्ध दिशेने फिरवतात. या तळ्याच्यामध्ये एक छिद्र असते त्यातून थोडे थोडे धान्य टाकतात आणि दोन्ही तळ्या एकमेकांवर घासून कडधान्याचे डाळीबरोबरच पीठ होऊन तळ्याच्या कडाच्या फटीतून बाहेर येते.