ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 17 मे: अलीकडे शेती आणि शेती संबंधित उद्योगांकडे उच्चशिक्षित तरुणांचा कल वाढतोय. यामध्ये आता महिलावर्गही पुढे आला आहे. लातूर जिल्ह्यातील उच्चशिक्षित महिलेनं खासगी नोकरी सोडून गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. चाकुर तालुक्यातील येलमवाडीच्या कविता वाडीवाले या गांडूळ खत विक्रीतून लाखोंची उलाढाल करत आहेत. त्यांच्या या प्रयोगातून शेतकऱ्यांनाही फायदा होत आहे. वाडीवाले यांनी सुरू केली कंपनी विज्ञान शाखेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या कविता वाडीवाले यांनी पुण्यातील खासगी कंपनीतील नोकरी सोडली. तसेच स्वत:ची आर्या ऑरगॅनिक या नावानं कंपनी सुरू केली. रासायनिक खत आणि औषधांमुळे जमिनीचा पोत खराब होतो. शेती उत्पन्नात घट होते. त्यासाठी कविता यांनी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला. गावातील महिलांना एकत्र करून त्यांनी गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण दिले. आता त्यांची वार्षिक उलाढाल 8 लाखांच्या घरात आहे.
गांडूळ खताचा निर्मितीची पद्धत गांडूळ खत निर्मितीमध्ये प्रामुख्याने शेणाचा वापर केला जातो. शेतकऱ्यांकडे गाई, म्हशी, बैल असतात त्यांचे शेण व शेतात पडलेला झाडाचा पाला पाचोळा एकत्र करून एका टब मध्ये साठवला जातो. त्यावर सतत 40 दिवस पाणी मारलं जातं. त्यात गांडूळ सोडले जातात. त्यानंतर काही दिवसांत गांडूळ खत निर्मिती होते. दर दोन महिन्याला उत्पन्न गांडूळ खत निर्मितीसाठी पूर्वी सिमेंट क्राँर्किटचे दोन हौद होते. विस्तारीकरणात प्लस्टिकचे दहा हौद विकत आणले आहेत. या हौदात स्वतःच्या व आजूबाजूच्या शेतामधील कचरा, जनावरांची उष्टावळ यापासून दोन महिन्यात 100 बॅग गांडूळ खत प्रथम तयार केले. 500 रुपये या दराने ते विकले. यातून 77 हजार 500 रुपये, गांडूळ बीज विक्रीतून 20 हजार रुपये, 129 लिटर व्हर्मीवाशचे 18 हजार रुपये मिळाले. सोलापूरच्या शेतकऱ्यानं आंब्याला दिलं चक्क शरद पवारांचं नाव! कारणही सांगितलं… Video शेतकऱ्यांकडून मागणी गांडूळ खताला लातूर शहरालगत असलेल्या नर्सरी आणि काही प्रगत शेतकरी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या प्रत्येक दोन महिन्याला खत निर्मितीमधून सुमारे दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे खत निर्मितीआधीच मागणी येत आहे. गांडूळ खताची मागणी वाढतच जाणार आहे. हा व्यवसाय अत्यंत तुटपुंड्या भांडवलात सुरू करता येतो. सेंद्रीय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याने या व्यवसायात मोठी संधी आहे, असे वाडीवाले सांगतात. आठ लाखाचे वार्षिक उत्पन्न गांडूळ खताची एक किलो, 5 किलो आणि 20 किलो अशा तीन प्रकारात विक्री केली जाते. यामध्ये प्रामुख्याने लातूर, मुंबई, पुणे येथील नर्सरी व्यवसायिक आणि शेतकरी यांना मालाचा पुरवठा केला जातो. या माध्यमातून दरवर्षी 8 लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याची माहिती कविता वाडीवाले यांनी दिली.