ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 4 जून: लम्पी रोगाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा या रोगाने पाय पसरायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत एकूण 571 जनावरे दगावली आहेत. या पशुधनाच्या नुकसानीपोटी शासनाने मार्च अखेरपर्यंत जवळपास 413 पशुधनाच्या 366 पालकांना मदत दिली आहे. त्यानंतर मात्र नुकसानभरपाई देण्यासंदर्भात शासनाकडून कुठलेही आदेश आले नाहीत. परिणामी जिल्ह्यातील 158 पशुपालक हतबल झाले आहेत. उर्वरित पशुपालक मदतीच्या प्रतीक्षेत असून वारंवार चौकशी करीत आहेत. शासन मदतीचा आदेश कधी काढणार असा सवाल व्यक्त होत आहे. बाहेरून औषधी मागविणाऱ्यांवर कारवाई रोगाच्या प्रतिबंधासाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून एक लाख लस पुरवठा करण्यात येणार आहेत. शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत मोफत उपचार आणि लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पशुपालकांनी औषधींची बाहेरून खरेदी करू नये. तरीही जर पशुवैद्यकीय दवाखान्यात बाहेरून औषधी आणण्यास सांगितल्यास, त्याची माहिती द्यावी. औषधी आणण्यास सांगणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे सीईओ गोयल यांनी सांगितले.
सध्या पशुधन खरेदी करणे टाळावे लम्पी चर्मरोगाची पशुधनात लक्षणे आढळल्यास तत्काळ माहिती द्यावी, अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो. सध्या जनावरांचे बाजार, शर्यती, प्रदर्शने, वाहतुकीवर बंदी आहे. अशा परिस्थितीत पशुधन खरेदी करू नये. तसेच ग्रामपंचायतीमार्फत 1167 गोठ्यांमध्ये कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली आहे. तसेच शीघ्र कृती दल स्थापन करण्यात आले आहे, असे सीईओ गोयल यांनी सांगितले. शेतकऱ्यांनो, वेळीच व्हा सावध! पश्चाताप टाळण्यासाठी पावसाळ्यात करु नका ‘ही’ चूक, Video रोग नियंत्रणासाठी घ्या दक्षता लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोठा व परिसर स्वच्छ, हवेशीर ठेवावा. परिसरात पाणी साठू देऊ नये. गोठ्यात व जनावरांवर कीटकनाशक औषधींची फवारणी करावी. नेहमी दूध उकळून प्यावे. जनावरांची वाहतूक करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.