ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 14 एप्रिल: बालविवाह ही आजची समस्या नसून तो मागच्या शतकातील विषय होता, अशी अनेकांची समजूत असते. पण आजही भारतात बालविवाहाचे प्रमाण 47 टक्के, तर महाराष्ट्रात 35 टक्के इतके आहे. कायदा करूनही बालविवाह रोखण्यात अपयश आले आहे. परंतु, आता बाळ झाल्यानंतर बालविवाह झाल्याचे लक्षात आले तरी कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहे. लातूर जिल्ह्यात असाच प्रकार घडला असून पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे बालविवाह करणारांना वेळीच सावध व्हावे लागणार आहे. बाळ जन्मल्यानंतर लक्षात आला बालविवाह कोरोना काळापासून ग्रामीण भागात मुला-मुलींच्या बालविवाहांचे प्रमाण वाढले आहे. औसा तालाक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा विवाह झाला. जुलै 2022 मध्ये मुलीचा विवाह झाला तेव्हा तिचे वय 14 वर्षे होते. नुकतेच तिने लातूरमधील रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. तेव्हा बालविवाहाचा प्रकार उघडकीस आला.
पतीवर गुन्हा दाखल विवाह झाला तेव्हा मुलगी अल्पवयीन असल्याची बाब पतीसह सर्वांना माहिती होती. तरीही पतीने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे मुलगी गरोदर राहिली. बाळाला जन्म दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असला तरी औसा पोलिसांनी या बालविवाहाची गंभीर दखल घेतली आहे. पतीविरोधात बलत्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तर आईवडील व सासू सासरे यांच्या विरोधात अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. लग्नात दिली नाही BMW, डॅाक्टर नवरदेव विमानतळावरच नवरीसोडून पळाला! बालविवाह एक सामाजिक समस्या भारतात बालविवाह ही एक सामाजिक समस्या आहे. कायद्याने विवाहासाठी मुलाचे वय 21 तर मुलीचे वय 18 निश्चित केले आहे. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असतात. यात मुलींच्या बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे. लोकसंख्यावाढीशी थेट संबंध असणाऱ्या बालविवाहांमुळे मातामृत्यू, गर्भपात, कुपोषित अर्भके, याचबरोबर स्त्रीशिक्षण आणि स्त्री सक्षमीकरणा संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात. महिला अत्याचाराला बळी पडणाऱ्यांमध्ये बालविवाह झालेल्या मुलींचे प्रमाण खूप मोठे आहे. त्यामुळे बालविवाह रोखले तरच शिक्षण आणि आरोग्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल.